७५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना एसटीतून मोफत प्रवासाची सुविधा सुरू; ‘या’ तारखेपूर्वी आरक्षण केलेल्या प्रवाशांना मिळणार परतावा

159

देशाच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटीतून मोफत प्रवास योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी झाला. या योजनेतंर्गत ज्येष्ठ नागरीकांना गुरुवार, २६ ऑगस्ट, २०२२ पासुन मोफत प्रवासाची सुविधा सुरु झाली आहे. दरम्यान, २६ ऑगस्ट पूर्वी आगाऊ आरक्षण केलेल्या व २६ ऑगस्टपासून प्रवास करणाऱ्या नागरिकांना तिकिटाचा परतावा दिला जाणार आहे, अशी माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली.

७५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना एसटीतून मोफत प्रवासाची सुविधा सुरू

राज्य शासनाने ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटीच्या सर्व सेवांमधून मोफत प्रवास तर ६५ ते ७५ वर्षादरम्यानच्या नागरिकांना सर्व सेवामधून ५० टक्के सवलतीमध्ये प्रवास करता येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. या योजनेचा बुधवारी विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान शुभारंभ झाल्यानंतर एसटी महामंडळ प्रशासनाने परिपत्रक जारी केले आहे. प्रवासादरम्यान आधारकार्ड, पॅनकार्ड, वाहन परवाना, पारपत्र, निवडणूक ओळखपत्र तसेच केंद्र आणि राज्य शासनातर्फे निर्गमित केलेले ओळखपत्र यापैकी कुठलेही एक ओळखपत्र वाहकाला दाखविल्यास ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना शुन्य मुल्य वर्गाची तर ६५ ते ७५ वयोगटातील ज्येष्ठांना सवलतीच्या दरातील तिकीट दिली जाईल. मात्र, सदरची सवलत शहरी बसेसकरीता लागू होणार नाही, तसेच सदर सवलत महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांना महाराष्ट्र राज्याच्या हद्दीपर्यंत अनुज्ञेय असेल, असे एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी स्पष्ट केले.

सदर योजनेला ‘अमृत ज्येष्ठ नागरिक’ हे नाव देण्यात आले आहे. या योजनेतंर्गत २६ ऑगस्ट, २०२२ च्या पूर्वी आगाऊ आरक्षण केलेल्या ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना तिकिटाच्या परताव्यासाठी जवळच्या आगारात, बसस्थानकावर तिकिटासह अर्ज व वयाच्या पुराव्याची प्रत सादर करावी लागणार आहे, असे चन्ने यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.