कोरोना काळात लॉकडाऊनमुळे अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचा-यांना वर्क फ्रॉम होमची सुविधा दिली होती. हा प्रयोग यशस्वी झाल्यामुळे अनेक कंपन्यांनी लॉकडाऊननंतरही आपल्या कर्मचा-यांसाठी वर्क फ्रॉमची सुविधा चालू ठेवली आहे. आता याचबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवे संकेत दिले आहेत.
घरातून काम करणारी इकोसिस्टीम आणि कमी तास काम करण्याची गरज ही काळाची गरज असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात सांगितले आहे. सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या कामगार मंत्र्यांच्या राष्ट्रीय परिषदेला संबोधित करताना मोदी बोलत होते.
कामगारांचे महत्वपूर्ण योगदान
एक विकसित राष्ट्र म्हणून ओळख निर्माण करुन देण्यासाठी भारताची स्वप्ने आणि आकांक्षा साकार करण्यात भारताच्या कामगार दलाची फार मोठी भूमिका आहे. ज्याप्रमाणे देशाने कामगारांना गरजेच्या वेळी साथ दिली, त्याप्रमाणे कामगारांनीही कोराना महामारीतून देशाला सावरण्यासाठी पूर्ण समर्पण केले आहे. देश बदलत आहे, सुधारणा करत आहे तसेच आपण कामगार कायद्यांमध्येही अनेक बदल केले आहेत, असे मोदी यांनी म्हटले.
नवीन कामगार कायदे
नवीन कामगार कायदे लागू करण्याबाबत अनेक दिवस सांगण्यात येत आहे. तसे झाल्यास कर्मचा-यांना आठवड्यातून चार दिवस काम करावे लागणार असून तीन दिवस सुट्टी मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. पण कर्मचा-यांना दिवसातून 12 तास काम करावे लागू शकते, अशा तरतुदी या नवीन कामगार कायद्यांमध्ये आहेत.
Join Our WhatsApp Community