शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने संभाजी ब्रिगेडशी युती केल्यानंतर सर्वच स्तरातून प्रतिक्रिया उमटू लागल्या असून, भाजपही त्यात मागे नाही. उद्धव ठाकरे यांनी आता फक्त ‘एमआयएम’सोबत जाणे बाकी आहे, अशी बोचरी टीका भाजपने केली आहे.
( हेही वाचा : ‘ब्रिगेड’शी संग केल्यामुळे शिवसेनेच्या जातीभेदविरहीत हिंदुत्त्वात येईल अडथळा – चंद्रशेखर साने)
ठाकरेंच्या नव्या युतीविषयी बोलताना ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन म्हणाले, काँग्रेस राष्ट्रवादी सोबत गेल्याने शिवसेना आधीच रसातळाला गेली. त्यामुळे संभाजी ब्रिगेडसोबत जाण्याने काही फरक पडत नाही. उद्धव ठाकरे यांनी आता फक्त एमआयएमसोबत जाणे बाकी आहे. मते मागण्यासाठी विनवण्या केल्या, हात वर करून सोनिया गांधींची शपथ घेतली, विरोधकांच्या मांडीला मांडी लावून बसले… हे बरोबर नाही. काँग्रस-राष्ट्रवादी सोबत जाताना त्यांनी एक सुसाईड बॉम्ब लावला होता. आता त्यांची राजकीय आत्महत्या झाली आहे, अशी टीका महाजन यांनी केली.
खोटा इतिहास सांगण्याचे आणि थापा मारण्याचे कौशल्य हा उद्धव ठाकरे आणि ब्रिगेडमधला समान धागा आहे. त्यामुळे ही युती नैसर्गिक आहे, अशी टीका भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्यावर वाईट काळ आला आहे. आता तरी त्यांना आत्मपरीक्षण करावे. २०१९ च्या निवडणुकीत संभाजी ब्रिगेडने ४० जागांवर निवडणूक लढवली होती. त्यांना या निवडणुकीत ०.०६ टक्के मिळाली. उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती करायला राज्यातील कोणताही महत्त्वाचा आणि मोठा पक्ष तयार नाही. गेल्या अडीच वर्षांच्या त्यांच्या कार्यकाळात राज्याची दुर्गती झाली. विकास खुंटला. त्यामुळे त्यांना आता ०.०६ टक्के मत घेणाऱ्या पक्षासोबत युती करावी लागत आहे. मात्र यातून त्यांच्या हाताला काहीच लागणार नाही.
ब्रिगेडने जातीयवादाचे विष पेरले – काळे
महाराष्ट्रात जातीयवादाचे विष पेरण्यासाठी राष्ट्रवादीची ‘बी’ टीम म्हणून ज्यांनी काम केले, त्या संभाजी ब्रिगेडशी राष्ट्रवादीची ‘ड’ टीम म्हणजे उद्धव सेनेची युती झाली. बाबासाहेब पुरंदरेंविरोधात या संघटनेने आंदोलने केली. संभाजी ब्रिगेडने नेहमीच जातीयवादी भूमिका घेतली आहे. बाळासाहेबांच्या शिवसेनेला हेच अपेक्षित आहे का? उद्धव ठाकरेंना कंटाळून आमदार, नगरसेवक निघून गेलेच, पण आता सामान्य शिवसैनिकही अस्वस्थ झाला आहे, अशी टीका मनसेचे गटनेते गजानन काळे यांनी केली.
भाजपने आपला इतिहास तपासावा – मनिषा कायंदे
नितिश कुमार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला बंदी घाला, अशी जाहीर मागणी केली होती. त्यांच्याशी भाजपने युती केली. मेहबुबा मुफ्तीच्या पीडीपी बरोबर त्यांनी सरकार चालवले. मायावतींशी संग केला. त्यामुळे भाजपने आधी आपला इतिहास तपासावा. संभाजी ब्रिगेडने बाबासाहेब पुरंदरे यांना जो विरोध केला होता, त्याची कारणे त्यांनी स्पष्ट केली आहेत. त्यामुळे भाजपने दुसऱ्यांना युतीधर्माबद्दल शिकवू नये. कारण त्यांनी कधीही युतीधर्म पाळला नाही, असे प्रत्युत्तर शिवसेनेच्या प्रवक्त्या आमदार मनिषा कायंदे यांनी दिले.
Join Our WhatsApp Community