मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर जवळपास ८० टक्के अपघात हे मानवी चुकांमुळे झाले आहेत, तसेच या महामार्गावर सर्वाधिक मृत्यू लेन कटिंगमुळे झाले आहेत, वेग मर्यादेचे उल्लंघन झाल्यामुळे झाले आहेत, अशी माहिती शासकीय अहवालातून समोर आली आहे.
दीड वर्षात १३१ जणांचा मृत्यू
१ जानेवारी ते ऑगस्ट २०१९ या कालावधीत वेग मर्यादेचे उल्लंघन केल्यामुळे सुमारे २.९ लाख गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, तर १६ हजार ९१८ जणांविरोधात सीट बेल्ट न लावता वाहन चालवल्याबद्दल गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. द्रुतगती महामार्गावर बेकायदेशीर पार्किंगची प्रकरणे समोर आली आहेत, ज्यामुळे अपघात झाले आहेत. घाट विभागात प्रति तास ५० किमी आणि महामार्गावरील इतर भागात कारसाठी प्रति तास १०० किमी वेग मर्यादा अनेक वाहनचालकांनी धुडकावून लावली होती. जे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. मागील दीड वर्षात महामार्गावर झालेल्या अपघातात १३१ जणांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी सांगते. जानेवारी-जुलै २०२१ च्या तुलनेत, जेव्हा एक्स्प्रेसवेवर ५७ मृत्यू झाले होते, २०२२ मध्ये ही आकडेवारी ४३ पर्यंत खाली आली. परंतु यावरून अल्पसंतुष्ट असणे योग्य नाही, कारण हा मार्ग शून्य अपघात असावा.
या कारणांमुळे होतात अपघात
द्रुतगती मार्गावरील अपघांताची तपशीलवार कारणमीमांसा पाहता, सर्वसाधारण ८० टक्के अपघात हे मानवी चुकांमुळे तर २० टक्के अपघात हे वाहनातील तांत्रिक बिघाडामुळे आणि अन्य कारणांमुळे झाल्याची नोंद आहे. मानवी चुकांमुळे अपघात होण्याची मुख्य कारणे म्हणजे द्रुतगती मार्गावर वाहतूक नियम न पाळणे. सिट बेल्ट न वापरणे, वाहने अतिवेगाने चालविणे आणि त्यामुळे पुढील वाहनांना धडकणे, वाहनांवरील नियंत्रण सुटणे, वाहन पलटी होणे, अवजड वाहने जलद मार्गिके (फास्ट लेन) मधून जाणे इत्यादी कारणामुळे गंभीर अपघात झाले आहेत.
Join Our WhatsApp Community