आधी गणेशोत्सवाची व्यवस्था महत्वाची, मग दसरा मेळावा परवानगीवर विचार

141

शिवसेनेचा परंपरागत दसरा मेळावा शिवतीर्थ अर्थात दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानामध्ये आयोजित केला जातो. मात्र,  शिवसेना कुणाची यावरून मुख्यमंत्री शिंदे गट आणि शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यामध्ये प्रचंड वाद सुरु असतानाच यंदाच्या दसरा मेळाव्याला परवानगी मिळावी म्हणून शिवसेनेचे राज्यसभा सदस्य अनिल देसाई यांनी २२ ऑगस्ट रोजीच महापालिकेच्या जी उत्तर विभागाला पत्र पाठवल्याची माहिती मिळत आहे. मात्र, सध्या  सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या परवानगी आणि गणेश मूर्तींचे विसर्जन व्यवस्था आदींवर महापालिकेचे प्रमुख लक्ष असून शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या परवानगीबाबबत गणेशोत्सवानंतरच या अर्जावर निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

२०२१मध्ये षण्मुखानंद सभागृहात घेण्यात आलेला मेळावा

शिवसेनाप्रमुख स्वर्गीय  बाळासाहेब ठाकरे यांनी ३० ऑक्टोबर १९६६ मध्ये शिवाजी पार्कवर पहिला दसरा मेळावा आयोजित केला होता. तेव्हापासून परंपरागत दसरा मेळाव्या आयोजन शिवाजी पार्कवर होत असतो. मागील ५५ वर्षांपासून शिवाजी पार्कवर दसरा मेळावा आयोजित केला जात असून मागील वर्षी कोविड प्रतिबंधक नियम असल्याने षण्मुखानंद सभागृहात आयोजित करण्यात आला होता. एकच नेता, एकच मैदान अशाप्रकारे दसरा मेळाव्याची सभा गाजवणाऱ्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना २४ ऑक्टोबर २०१२ च्या सभेला प्रकृतीमुळे उपस्थित राहता आले नाही, परंतु त्यांनी व्हीडीओ कॉन्फरन्सीद्वारे शिवसैनिकांना संबोधित केले होते. शिवसेनेच्या इतिहासात प्रथम दोन वेळा दसरा मेळावा रद्द करण्याची वेळ आली होती. एकदा २००६ मध्ये मुसळधार पाऊस आल्यानेच २००९च्या विधानसभा निवडणुका लागल्याने आचारसंहितेअभावी रद्द कराव्या लागल्या होत्या. त्यानंतर सन २०२०मध्ये कोविड अभावी तर २०२१मध्ये शिवाजी पार्क अभावी षण्मुखानंद सभागृहात घेण्यात आला होता.

(हेही वाचा गणरायांचा आगमन आणि विसर्जन मार्ग खड्डेमुक्त : रॅपिड हार्डनिंग काँक्रिट पद्धतीची मात्रा)

खासदार अनिल देसाईंच्या स्वाक्षरीने परवाणगी पत्र

यंदा शिवसेनेतून शिंदे गट फुटून त्यांनीच आपली मूळ शिवसेना असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे या सर्व पार्श्वभूमीवर शिवसेनेने आधीच सावध पावित्रा घेत २२ ऑगस्ट रोजीच महापालिकेच्या जी उत्तर विभागाला अर्ज दिल्याची माहिती मिळत आहे. हा अर्ज शिवसेना नेते व खासदार अनिल देसाई यांच्या स्वाक्षरीने सादर केल्याची माहिती मिळत आहे. मात्र, आजवर मेळाव्यासाठी नवरात्रोत्सवातच अर्ज केला जायचा, पण यंदा गणेशोत्सवाच्या आधीच अर्ज केला आहे. परंतू दसरा मेळाव्याच्या परवानगीचा विषय आज महत्वाचा  नसून सध्या गणेशोत्सव मंडळाच्या मंडपांना परवानगी देण्याचा प्राधान्यक्रम आहे. याशिवाय गणेशोत्सवात गणेश विसर्जन मार्गावरील खड्डे भरणे तसेच समुद्र चौपाटींसह कृत्रिम तलावांसह विसर्जन स्थळांची व्यवस्था आणि भाविकांना सेवा सुविधा पुरवणे या कामांना प्राधान्य क्रम राहिल आणि गणेशोत्सवानंतर या अर्जाबाबतचा निर्णय घेतला जाईल,असे महापालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले. यापूर्वी शिवाजी पार्कमध्ये दसरा मेळावा घेण्यासाठी न्यायालयातून परवानगी आणणे बंधनकारक होते. परंतु २०१६मध्ये शासन निर्णयाच्या आदेशानुसार यासाठी परवानगी देण्याचे अधिकार महापालिकेला प्राप्त झाले आहे. त्यामुळे २०१७ पासून दसरा मेळाव्याची परवानगी जी उत्तर विभागाच्या माध्यमातून दिली जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.