मुंबई-गोवा महामार्गाच्या कामात मुद्दाम अडथळे आणणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा – रवींद्र चव्हाण

178

मुंबई-गोवा महामार्गाच्या कामामध्ये कोणी मुद्दाम अडथळे आणत असतील आणि त्यामुळे रस्त्याचे काम अर्धवट राहिल्याने अपघात होत असतील, तर हे खपवून घेतले जाणार नाही. अशा प्रवृत्तीच्या लोकांवर थेट गुन्हे दाखल करून कारवाई करावी, अशी सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी शनिवारी दिली.

वागदे येथील कामही तातडीने पूर्ण करावे

महामार्गाचा पाहणी दौरा पूर्ण केल्यानंतर ते बोलत होते. चव्हाण म्हणाले, महामार्गावर अपघातामध्ये लोक दगावत आहेत आणि त्यासाठी रखडलेली कामे कारणीभूत ठरत आहेत. ही रखडलेली कामे तातडीने मार्गी लागण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाने, तसेच प्रांताधिकाऱ्यांनी कार्यवाही करावी. नांदगाव येथील मोबदल्याचा प्रश्न तातडीने सोडवून ही जमीन राष्ट्रीय महामार्ग विभागास द्यावी. वागदे येथील कामही तातडीने पूर्ण करावे. वेताळ बाबंर्डे येथील पुलाजवळील काम मार्गी लावावे. महामार्गाच्या कामामुळे मुलांना शाळेत जाताना अडचणी येतात. त्यासाठी तिथे मुलांना सुरक्षितरित्या शाळेमध्ये जाता येईल असे पहावे. ही सर्व कामे तातडीने हाती घेण्यात यावी. कुडाळ येथे आरएसएन हॉटेल जवळ ब्लिंकर्स, रम्बलर्स व रिफ्लेक्टर्स तातडीने लावण्यात यावेत. तसेच येथे बॉक्सवेल उभारण्याचा प्रस्तावही तयार करावा. जिल्ह्यात ज्या ठिकाणी रेल्वे क्रॉसिंग ब्रीजची आवश्यकता आहे अशा सर्व ठिकाणांचे प्रस्ताव लवकरात लवकर पाठवावेत, अशा सूचना त्यांनी दिल्या.

(हेही वाचा शिर्डीत फूल-हारावरील बंदी तूर्त कायम, धोरण निश्चितीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती)

चर्चेने समस्या सोडवा

महामार्गावर अपघात होऊन एखाद्याचा जीव जाणे ही दुर्दैवी घटना आहे. अशा घटना थांबवण्यासाठी नियोजन करावे. आपण हे राष्ट्रीय काम करत आहोत हे सर्वांनी लक्षात घ्यावे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी संवेदनशील व लवचिक राहून लवकरात लवकर प्रश्न सोडवण्यावर भर द्यावा. महामार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण होणे आवश्यक आहे. छोट्या छोट्या समस्यांमुळे काम रखडणे चुकीचे आहे. या सर्व समस्या सर्व संबंधित विभागांनी एकत्र चर्चा करून सोडवल्या पाहिजेत. वागदे येथे धोकादायक वळण आहे. त्याची माहिती वाहन चालकांना व्हावी यासाठी तिथे चिन्हे, वेग मर्यादा तसेच रिफ्लेक्टर्स बसवावेत, असेही चव्हाण यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.