पत्नीच्या मित्राकडून पतीची हत्या, तर विवाहित प्रेयसीकडून प्रियकराची हत्या

165

मुंबईतील पश्चिम उपनगरात मागील २४ तासात दोन हत्यांच्या घटना समोर आल्या आहेत. एका घटनेत पत्नीच्या मित्रांनी पतीची हत्या केली, तर दुसऱ्या घटनेत लिव्ह अँड रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या महिलेने जोडीदाराची गळा आवळून हत्या केली आहे. सांताक्रूझ पूर्व आणि आरे कॉलनी या ठिकाणी घडलेल्या या दोन्ही घटनाप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्यात आली आहे.

परवेज शेख (४१) असे सांताक्रूझ पूर्व वाकोला गोळीबार येथे झालेल्या घटनेतील मृत व्यक्तीचे नाव आहे. परवेज शेख हा ठाण्यातील राबोडी येथे कुटुंबियांसह राहण्यास होता. इमिटेशन ज्वेलरीचा व्यवसाय करणाऱ्या परवेजची पत्नीला तिचा सांताक्रूझ पूर्व वाकोला येथे राहणारा जुना मित्र अकिल हा सतत फोन करून त्रास देत होता, तिने याबाबत आपल्या पतीला सांगितले होते व राबोडी पोलीस ठाण्यात अकिल विरुद्ध तक्रार दाखल केली होती. त्यानंतर देखील त्याने त्रास देणे सुरूच ठेवल्यामुळे परवेज हा त्याला समज देण्यासाठी शुक्रवारी रात्री वाकोला गोळीबार रोड येथे आला होता. दोघांमध्ये शाब्दिक भांडण होऊन अकिल याने परवेजला चाकूने भोसकुन पळ काढला. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी जखमी परवेजला उपचारासाठी व्ही एन.देसाई रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी वाकोला पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून रात्री उशिरा अकिल याला अटक केली आहे.

(हेही वाचा आधी गणेशोत्सवाची व्यवस्था महत्वाची, मग दसरा मेळावा परवानगीवर विचार)

लिव्ह अँड रिलेशिपसीप मधून हत्या…

दुसरी घटना शनिवारी सकाळी गोरेगाव पूर्व आरे वसाहत येथे घडली. मागील एक वर्षांपासून लिव्ह अँड रिलेशनशिप मध्ये राहणारे रमजान शेख आणि जोहरा शाह यांच्यात मागील काही महिन्यांपासून लग्न करण्यावरून भांडण सुरू होती. या भांडणाचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी दोघांनी पोलीस ठाण्यात जाण्याचा निर्णय घेतला. रमजान शेख याने स्वतःची रिक्षा काढली आणि दोघे त्याच्या रिक्षातून आरे सब पोलीस ठाण्याच्या दिशेने जात असताना दोघांमध्ये पुन्हा रिक्षातच भांडण झाले. या भांडणातून जोहरा शाह हिने स्वतःची ओढणी रमजानच्या गळ्याभोवती आवळून त्याची हत्या केली. त्यानंतर जोहरा ही स्वतः पोलीस ठाण्यात हजर होऊन तीने केलेल्या गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली. आरे सब पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून जोहरा हिला रमजानच्या हत्येप्रकरणी अटक केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.