सध्या महाराष्ट्रातील राजकारणात शिवसेना नक्की कुणाची, उद्धव ठाकरे यांची की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची, हा मुख्य प्रश्न बनलेला आहे. हा वाद सर्वोच्च न्यायालयात दाखल झाला असून तो प्रलंबित आहे. असे असूनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने त्यांचे मुख्यालयात थेट शिवसेना भवनाच्या समोरच उभारण्याचा निर्णय घेतला आहे. आता शिवसेनेचा ४ दशकाहून अधिक वर्षांची परंपरा असेलला दसरा मेळावाही एकनाथ शिंदे गट शिवसेना म्हणून घेणार असल्याची चर्चा सुरु झाली असतानाच आता ठाण्यातील शिवसेनेच्या कार्याचा केंद्रबिंदू असलेला धर्मवीर आनंद दिघे यांचा आनंद आश्रम हादेखील एकनाथ शिंदे गटाचा आहे, असा दावा या गटाने केला आहे. शिंदे गटाने प्रसिद्ध पत्रकाद्वारे हे जाहीर केले आहे.
मुख्यनेते पदी एकनाथ शिंदे
या पत्रकात म्हटल्याप्रमाणे, शिंदे गटाचे मध्यवर्ती कार्यालय हे आनंद आश्रम असणार आहे, तर मुख्यनेते पदी एकनाथ शिंदे असतील, असे शिंदे गटाच्या पत्रामध्ये म्हटले आहे. धर्मवीर आनंद दिघे हे गेल्यानंतर त्यांच्या मागे ठाण्यात शिवसेना कुणी सांभाळली असेल तर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांभाळली आहे. ठाण्यातील जो आनंद आश्रम आहे, त्याच्या विश्वस्त पदावरही आम्ही सर्वांचीच नावे आहेत, त्यामुळे तो बळकावला असे म्हणता येणार नाही तो आमचाच आहे, असे शिंदे गटाचे नेते, ठाण्यातील माजी महापौर नरेश म्हस्के म्हणाले. त्यामुळे ठाण्यात या विषयावरून आणखी वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण ठाण्यात खासदार राजन विचारे यांनी उद्धव ठाकरे यांची पाठ सोडली नाही, तर धर्मवीर आनंद दिघे यांचा भाचा यानेही एकनाथ शिंदे यांना विरोध करत उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दिला आहे.
(हेही वाचा शिर्डीत फूल-हारावरील बंदी तूर्त कायम, धोरण निश्चितीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती)
Join Our WhatsApp Community