मुंबई – अभिनेता सुशांतसिंग रजपूत प्रकरणात बॉलिवूडमधील अनेक कलाकारांची नावे ड्रग्ज कनेक्शनमध्ये येत आहेत. शुक्रवारी एनसीबी अभिनेत्री रकुलप्रीत सिंग आणि दीपिका पादुकोण यांची मॅनेजर करिश्मा प्रकाश हिची चौकशी करत आहे. तसेच रकुलप्रीत आणि दीपिका पादुकोणचे मॅनेजर करिश्मा प्रकाश यांना समन्स बजावून एनसीबीसमोर हजर होण्यास सांगितले होते. याशिवाय शनिवारी दीपिका पादुकोणला एनसीबीसमोर हजर व्हावे लागणार आहे.
रकुल प्रथम एनसीबी कार्यालयात पोहोचली आणि त्यानंतर करिश्मा प्रकाश तिथे पोहचली. एनसीबीने या प्रकरणात दीपिका, रकुल, श्रद्धा कपूर, सारा अली खान आणि इतरांना चौकशीसाठी बोलावले आहे. ड्रग्ज रॅकेटच्या तपासाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. आता या प्रकरणाची नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने धर्मा प्रोडक्शनचे कार्यकारी निर्माता क्षितिज प्रसाद यांना समन्स बजावले आहे. याप्रकरणात एनसीबीला काही महत्त्वाची माहिती मिळाली आहे. त्यानुसार क्षितिज प्रसाद हे काही ड्रग पेडलर्सच्या संपर्कात होते. क्षितिज हे करण जोहरच्या निकटवर्तीय आहेत. २०१९मध्ये करण जोहरच्या घरात एक पार्टी होती, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओबद्दल तक्रार मिळाल्यानंतर, मुंबई एनसीबीची टीम व्हिडिओसंदर्भात ड्रग्स प्रकरणाची चौकशी करण्यात गुंतली आहे. या व्हिडिओमध्ये करण जोहर व्यतिरिक्त दीपिका पादुकोण, मलायका अरोरा, रणबीर कपूर, वरुण धवन, शाहिद कपूर आणि विक्की कौशल उपस्थित होते.
दीपिका घाबरते म्हणून चौकशीदरम्यान तिच्यासोबत राहू द्यावे – रणवीर
रणवीर सिंग याने एनसीबीला निवेदन दिले आहे, ज्यामध्ये दीपिका पादुकोण कधीकधी चिंताग्रस्त होते आणि घाबरते म्हणून तिच्या चौकशीदरम्यान मला सोबत राहण्याची परवानगी दिली जावी. मी कायदा पाळणारा नागरिक आहे. दीपिकाची चौकशी सुरु असताना कायद्याने आपण तिच्यासोबत राहू शकत नाही, तरीही आपलय विनंतीचा विचार करावा, अशी विनंती केली.