गणेशोत्सव एक चळवळ

190

गणेशोत्सव हा महाराष्ट्रातला सर्वात मोठा उत्सव आहे. त्यात कोकण प्रांतातला गणेशोत्सव पाहण्यासारखा असतो. गणपती बाप्पा आणि स्वातंत्र्य चळवळीचा संबंध आहे. लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करुन जातीजातींमध्ये विखुरलेल्या हिंदूंना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. गणपती हा गणांचा नायक आहे, सेनापती आहे, पराक्रमी पुरुष आहे. त्याचबरोबर तो प्रचंड बुद्धिमान आहे. गणेशाने अनेक युद्धात सहभागी होऊन देवगणांना विजय प्राप्त करुन दिलेला आहे असे अनेक उल्लेख आपल्याला सापडतात.

उत्सव की स्पर्धा?

आपण श्रद्धेने घरात गणपती आणतो. यामागे आपल्या कुटुंबाचं कल्याण व्हावं असा उद्देश असतो. घरात गणपती असेल तर लोकांना प्रसन्न वाटते. ते ५ – ७ दिवस एक वेगळंच अध्यात्मिक आणि आनंददायी वातावरण तयार होतं. पण सार्वजनिक गणेशोत्सवाचं प्रयोजन स्वातंत्र्यप्राप्तीसाठी लोकांची एकजूट साधणे हे होतं. मग आता आपण सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करुन नेमकं काय साध्य करणार आहोत? माझा गणपती मोठा की तुझा? अशी स्पर्धा आपल्याला करायची आहे का? अगदी स्पष्टपणे सांगायचं तर लोकमान्य टिळकांनी जी परंपरा सुरु केली होती, ती परंपरा आपण चालवत आहोत. पण त्या परंपरेतला आत्मा आता राहिलेला नाही.

स्मार्ट बाप्पा

कोणतीही कृती करताना, आपण ती कृती का करतो याची स्पष्टता आपल्याला असायला हवी. मग त्यातून आपल्याला कोणते लाभ होणार आहेत आणि कशाप्रकारचं नुकसान होणार आहे याचं गणित आपण मांडलं पाहिजे. या विचाराशिवाय केलेली कृती ही मृत शरीराप्रमाणे असते. शरीरात प्राण असेल, आत्मा असेल तरच त्या शरीराला शोभा असते. आपल्या ज्ञानेश्वर महाराजांनी देवाकडे जगाच्या कल्याणासाठी पसायदान मागितलं. मग त्यांच्याकडून आपण प्रेरणा घ्यायला नको का? गणेशोत्सव हिंदुंचं संघटन करण्याच्या दृष्टीने आणि भारतात हिंदू भावविश्व निर्माण करुन संविधानाचा बचाव करण्याच्या दृष्टीकोनातून साजरा झाला पाहिजे. आधुनिक युगाच्या भाषेत सांगायचं तर आपला गणपती हा स्मार्ट हवाय.

मंडळं हवी, नवस करण्याची केंद्र नकोत

आपल्याला कार्तिकेय आणि गणपतीची ती कथा माहीत आहे ज्यात दोघांत ब्रह्मांडाची प्रदक्षिणा करण्याची स्पर्धा लागते. कार्तिकेय खरोखर प्रदक्षिणा घालायला जातो आणि गणपती आई-वडिलांना प्रदक्षिणा घालतो आणि तत्वज्ञानाद्वारे हे सिद्ध करतो की आई-वडील हेच त्याचं ब्रह्मांड आहे. आजच्या युगात सांगायचं तर गणपतीने स्मार्ट वर्क केलं. त्यामुळे आपला गणपती मुळातच स्मार्ट आहे. ज्यावेळी कोरोनाचं संकट आलं होतं. तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्र्यांना काहीच करता येत नव्हतं म्हणून त्यांनी विठ्ठलाला साकडं घातलं. असा नेता कोणाला हवा असेल?

विठ्ठलावर श्रद्धा असणं वेगळं आणि आता माझ्याकडून काहीच होत नाही, तूच काहीतरी कर असा नवस करणं वेगळं. आपले सगळे देव प्रचंड कर्तृत्ववान आहेत. म्हणून गणेशोत्सवाचं मंडळ हे नवस करण्याची केंद्र होऊ नये. उलट तरुणांनी जोमाने काम करुन भारताच्या विकासात योगदान द्यावे, अशी ऊर्जा या गणेशोत्सव मंडळाकडून मिळायला हवी. दुर्दैव असं आहे आपला देव स्मार्ट आहे, पण भक्त स्मार्ट नाहीत.

जसा देव, तसा भक्त

सर्व गणेशोत्सव मंडळांनी एक वेळ ठरवली पाहिजे. आरती झाल्यानंतर सर्वांनी सामूहिकरित्या प्रतिज्ञा घेतली पाहिजे, ज्यात आपण हिंदू आहोत याचा अभिमान असेल आणि आपण आपल्या देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी व हिंदू म्हणून एकजूट साधण्यासाठी कटिबद्ध आहोत अशा स्वरूपाचा भाव असेल. आपल्या गणपतीची मूर्ती कशी असावी? तर मरगळ झटकून जोमाने काम करण्यास प्रोत्साहित करणारी असावी. जसा देव तसा भक्त. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी भारताच्या समृद्धीत हातभार लागेल अशा स्वरुपाचे कार्यक्रम आयोजित करावेत. गणेशोत्सव ही एक चळवळ आहे, केवळ उत्सव नव्हे. या उत्सवातून आपल्याला देशविघातक शक्तींविरोधात लढण्याची आणि देशाला प्रगतीपथावर घेऊन जाण्याची प्रेरणा नक्कीच मिळेल. हिंदूंच्या कोणत्याही देवाकडे पाहिल्यावर दोन भाव मनात निर्माण होतात, एक आनंद-भक्तिभाव आणि दुसरा म्हणजे काहीतरी करुन दाखवण्याची भावना.

सावरकरः क्रांतिकारकांचे नायक

लोकमान्य टिळकांचा सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यामागे जो भाव होता, तो भाव आपण लक्षात घेतला पाहिजे. त्यावेळी आपण पारतंत्र्यात होतो, आपल्यावर बंधने होती. पण आता आपण स्वतंत्र झालो आहोत. या स्वातंत्र्याचा अर्थ उत्सवांमध्ये मौज मजा करण्याइतपत घेऊ नये. त्यापलीकडे जाऊन विचार करावा लागेल. लक्षात ठेवा गणपती हे राष्ट्रीय दैवत आहे. गणपतीचं नाव विनायक, तो गणांचा नायक. सावरकरांचं नाव विनायक, ते क्रांतिकारकांचे नायक होते. या विनायक नावात प्रचंड ऊर्जा आहे. ती ऊर्जा राष्ट्राच्या कामासाठी खर्च केली पाहिजे. गणेशोत्सवात केवळ डीजेच्या तालावर नाचण्यात नव्हे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.