राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यामध्ये आगामी महापालिका निवडणुकीत खऱ्या शिवसेनेसोबत भाजपची युती असेल असे जाहीर केले. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांची शिवसेनाच खरी असल्याचे सांगत भाजपने त्यांच्यासोबत भविष्यात युती असेल असे जाहीर केले आहे. परंतु आगामी सार्वत्रिक निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटाला मुंबईत अधिक जागा आपल्या झोळीत पाडून घेण्यासाठी उध्दव ठाकरे यांच्या गटाकडे असलेले जास्तीत जास्त आमदार आणि नगरसेवक फोडावे लागणार आहेत. शिंदे गटाकडे जेवढे जास्त आमदार असतील तेवढ्या जास्त जागा वाटपात त्यांना महापालिका निवडणुकीत मिळू शकतील असे बोलले जात आहे.
शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांचा गट फुटून सत्तेत आला आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटाला भाजपने पाठिंबा देत राज्यात मुख्यमंत्री पदाची माळ त्यांच्या गळ्यात घातली. त्यामुळे राज्यातील सरकार शिंदे यांच्या बाळासाहेब शिवसेना गट आणि भाजप युतीचे असले तरी आगामी महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत या दोन्ही पक्षांची युती होण्याची जवळपास पक्के झाले आहे. त्यामुळे शिंदे यांच्या बाळासाहेब शिवसेना गट आणि भाजप अशाप्रकारे युतीमध्ये महापालिकेच्या निवडणुका लढणार आहे.
मुंबई महापालिकेमध्ये सध्या शिवसेनेचे एकूण ९७ नगरसेवक होते, तर भाजपचे ८४ नगरसेवक होते. परंतु आता शिवसेनेचे दोन तुकडे झाले असून मुंबईतील शिवसेनेचे सदा सरवणकर, प्रकाश सुर्वे, मंगेश कुडाळकर, दिलीप लांडे आणि यामिनी जाधव असे पाच आमदार हे शिंदे गटाकडे गेले आहे. शिवसेनेचे मुंबईत १३ आमदार असून त्यातील अंधेरी पूर्व येथील आमदार रमेश लटके यांचे निधन झाले. त्यामुळे मुंबईतील पाच आमदार फुटल्याने शिवसेनेकडे ७ आमदार शिल्लक आहेत. त्यामुळे आतापर्यंत शिंदे गटाकडे असलेल्या पाच आमदारांच्या मतदार संघातील भाजप वगळता सर्व नगरसेवकांचे प्रभाग भाजप त्यांना सोडणार असल्याचे बोलले जात आहे. आतापर्यंत माजी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, शितल म्हात्रे, समाधान सरवणकर आदी नगरसेवक हे शिंदे यांच्या शिवसेना गटाकडे आहेत.
( हेही वाचा: अखेर काँग्रेसला मिळणार नवा अध्यक्ष, या तारखेला होणार अध्यक्षपदाची निवडणूक )
शिंदे गट हा नवीन असल्याने, त्यांना आगामी निवडणुकीच्या युतीमध्ये जागा वाटपामध्ये अधिक जागा वाढवून घ्यायच्या असल्यास अजून काही आमदार फोडावे लागणार आहेत. या व्यतिरिक्त भाजपचे आमदार असलेल्या मतदार संघातील शिवसेनेच्या नगरसेवकांना फोडावे लागणार आहेत. त्यामुळे निवडणुकीपूर्वी शिंदे गट हे शिवसेनेसह इतर पक्षातील किती आमदार आणि नगरसेवकांना फोडून आपल्याकडे आणण्याचा प्रयत्न करतात, यावरच त्यांच्या जागांचा कोटा वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिंदे गटाला आगामी निवडणुकीची रणनिती आखताना तोडाफोडीचेच राजकारण करावे लागणार असून भविष्यात धनुष्यबाणाचे चिन्ह शिंदे गटाला मिळाल्यास मग शिवसेनेतील बरेच लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी स्वत:हून त्यांच्याकडे वळतील. परंतु धनुष्यबाण कुणालाच न मिळाल्यास ठाकरे आणि शिंदे गटाला मोठी ताकद लावून निवडणुकीत उतरावे लागणार आहे. मात्र, शिंदे गटाला ज्याप्रमाणे भाजपशी युती केल्याचा फायदा मिळेल तसेच ठाकरे यांच्या शिवसेनेला राष्ट्रवादी काँग्रेस इतर पक्षांसोबत युती केल्याचाही फायदा मिळणार असल्याने आगामी निवडणूक ही ठाकरे आणि शिंदे यांच्या शिवसेना गटातच अटीतटीची होणार असल्याचे पहायला मिळणार आहे.
Join Our WhatsApp Community