‘पुढचे पाच वर्ष न्यायालयाचा निकाल लागणार नाही’, शिंदे गटाच्या आमदाराचे सूचक विधान

148

शिवसेनेवर नेमका हक्क कुणाचा याबाबतचा निर्णय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना या निर्णयाला सातत्याने नवीन तारीख देण्यात येत आहे. त्यामुळे याबाबतचा निकाल नेमका कधी लागणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले असताना शिंदे गटाचे आमदार आणि प्रतोद भरत गोगावले यांनी मोठे विधान केले आहे.

पुढील पाच वर्षे न्यायालयात निकाल लागणार नाही, असे गोगावले यांनी म्हटले आहे. कर्जत राठापूर विधानसभा मतदारसंघातील एका कार्यक्रमात ते बोलत होते.

काय म्हणाले गोगावले?

आम्ही मूळचे शिवसैनिक असून धनुष्यबाण निशाणी ही शिंदे गटाकडेच राहणार आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार पडण्याच्या वावड्या विरोधकांकडून उठवण्यात येत आहेत. न्यायालयातील प्रत्येक सुनावणीवेळी शिंदे गट अपात्र होईल, असे सांगण्यात येत होते. पण आता हे प्रकरण घटनापीठाकडे गेले आहे, यावर निकाल यायला किती काळ लागेल हे सांगता येणार नाही. पुढची चार ते पाच वर्ष निकालाला विलंब होऊ शकतो, असे भरत गोगावले यांनी म्हटले आहे.

(हेही वाचाः गणेशोत्सव मंडळांना मिळणार घरगुती दरात वीज, महावितरणचा निर्णय)

तसेच पुढची निवडणूक ही आपण लढवू आणि पुन्हा एकदा जिंकून सत्तेत येऊ, असे सूचक विधान देखील यावेळी भरत गोगावले यांनी केले आहे. त्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.