सीमा क्षेत्रातील महिलांना स्वयंरोजगारित करण्यासाठी सैन्य दल आणि असीम फाऊंडेशनचे मोठे कार्य

180

भारताच्या पूर्व सीमेवरील सर्वात पहिले गाव असलेल्या किबिथू येथे असीम फाऊंडेशनच्या माध्यमातून मोठे कार्य करण्यात येत आहे. तेथील महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी असीम फाऊंडेशनतर्फे ‘किबिथू बेकरी’ चालवण्यात येत आहे. दुर्गम भागातील महिलांना सक्षम करण्यासाठी असीमतर्फे हा उपक्रम चालवण्यात येत असून त्याबाबतची माहिती या संस्थेचे संस्थापक कार्यकर्ते सारंग गोसावी यांनी दिली आहे.

महिलांना रोजगार देण्यासाठी कार्य

भारतात सूर्याची सर्वात पहिली किरणे ज्या गावी पडतात ते अरुणाचल प्रदेश मधील किबिथू हे गाव. याठिकाणी असलेल्या सैन्य दलाच्या युनिटशी असीमने चर्चा केली असता तिथे अनेक सुविधांचा अभाव असल्याचे जाणवले. पुरुषांना रोजगार उपलब्ध असला तरी महिलांना मात्र रोजगाराचे कुठलेही साधन उपलब्ध नव्हते. त्यामुळे याठिकाणी असीमने तीन स्तरांवर काम करण्याचे ठरवले. सगळ्या गावांमध्ये सोलार ग्रीड देणे, तसेच इंटरनेटच्या सुविधा उपलब्ध करुन देणे आणि महिलांना रोजगारीत करण्यासाठी एक बेकरी स्थापन करण्याचा निर्णय संस्थेच्या वतीने घेण्यात आला.

New Project 85

‘किबिथू बेकरी’ची स्थापना

महिलांसाठी महिलांनी चालवलेली ही किबिथू बेकरी आहे. येथील महिलांना या बेकरीमध्ये रोजगार उपलब्ध करुन देण्यात आले असून विशेष म्हणजे महिलांना या व्यवसायाचे प्रशिक्षण जम्मू-काश्मीरमधील उरी येथील एक मुलीने दिले आहे. जम्मू-काश्मीरमध्येही असीम फाऊंडेशनच्या माध्यमातून एकूण 10 बेकरी चालवण्यात येत असून त्याद्वारे 40 पेक्षा जास्त महिलांना स्वयंरोजगारित करण्यात आले आहे.

New Project 84

येथील सैन्य दलाच्या युनिटने या उपक्रमाचे यश पाहिल्यानंतर किबिथू इथे असाच उपक्रम राबवण्याची कल्पना संस्थेला सांगितली. त्यामुळे बेकरी उद्योगाच्या माध्यमातून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली असून हळूहळू येथील सर्व नागरिकांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. जेणेकरुन येथील नागरिकांना आपले पोट भरण्यासाठी स्थलांतर करण्याची गरज भासणार नाही आणि याचा फायदा भारताला सुरक्षेच्या दृष्टिकोनातून देखील होण्यास मदत होणार असल्याचे असल्याचे सारंग गोसावी यांनी सांगितले.

असीम फाऊंडेशनचे कार्य

जम्मू-काश्मीर येथे 2002 पासून असीम फाऊंडेशनने आपले कार्य सुरू केले आणि 2010 रोजी संस्थेला अधिकृत मान्यता मिळाली. शिक्षण, सामाजिक उद्योजकता, सैन्य आणि सैन्य दलाबद्दल जागृती करणे हे संस्थेचे मुख्य उद्दिष्ट आहे. लडाख येथे या संस्थेच्या माध्यमातून सायन्स पार्क तयार करण्यात आले असून असीमच्या पुढाकाराने आता तेथे एक आयटी कंपनी देखील सुरू करण्यात आली आहे.

प्लास्टिकमुळे होणारे प्रदूषण टाळण्यासाठी लडाखमध्ये संस्थेच्या माध्यमातून ठिकठिकाणी वॉटर एटीएम्स सुरू करण्यात आली आहेत. येथील शाळांसाठी देखील असीमने सहकार्य केले आहे. कुपवाडा गावात सैन्य दलात वीरमरण आलेल्या हुतात्म्यांच्या वीर नारींना स्वयंरोजगार मिळवून देण्यासाठी असीमने बेकरी चालू केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.