मथुरा येथील ईदगाह मशिदीच्या वादग्रस्त जागेचे वैज्ञानिक सर्वेक्षणाची मागणी करणाऱ्या अर्जावर 4 महिन्यात सुनावणी पूर्ण करा असे निर्देश अलाहबाद उच्च न्यायालयाने सोमवारी जिल्हा न्यायालयाला दिले आहेत. मुगल बादशाह औरंगजेबच्या काळात मथुरा येथील कृष्ण जन्मभूमी मंदिरावर आक्रमण करून ईदगाह मशिद उभारण्यात आली होती. यासंदर्भात हिंदु-मुस्लीम पक्षात वाद आहेत. याप्रकरणी सुमारे दीड वर्षापूर्वी याचिकाकर्ते मनीष यादव यांनी अधिवक्ता रामानंद गुप्ता यांच्या माध्यमातून मथुरा येथील जिल्हा न्यायालयात अर्ज सादर करून ईदगाह मशिदीच्या वादग्रस्त जागेचे सर्वेक्षण करण्याची मागणी केली होती.
(हेही वाचा – National Sports Day 2022: “भारतभर खेळांची लोकप्रियता वाढत राहिली पाहिजे”)
अर्जानुसार, भगवान श्री कृष्ण विराजमान यांच्या वतीने वादग्रस्त जागेचे वैज्ञानिक सर्वेक्षण आणि देखरेखीसाठी न्यायालय कमिशनरची नियुक्ती करण्याची मागणी करण्यात आली होती. परंतु, या अर्जावर गेल्या वर्षभरात काहीच कारवाई झाली नाही. त्यामुळे याचिकाकर्त्यांनी अलाहबाद उच्च न्यायालयात धाव घेतली. याचिकाकर्ते मनीष यादव यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात अर्ज दाखल करून सुनावणी लवकर पूर्ण करण्याची मागणी केली. तसेच उच्च न्यायालयाला या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची विनंती केली होती.
याप्रकरणी न्या. पीयूष अग्रवाल यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आलीय. यावेळी उच्च न्यायालयाने मथुरा जिल्हा न्यायालयाला 4 महिन्यांत सुनावणी पूर्ण करून शाही ईदगाह मशिदीच्या वादग्रस्त जागेचे वैज्ञानिक सर्वेक्षण करण्याची मागणी करणारा अर्ज निकाली काढण्याचे निर्देश दिलेत. या अर्जावर उच्च न्यायालयाने अधीनस्थ न्यायालयाकडून अहवाल मागवला होता. सोमवारी उच्च न्यायालयाने हा अर्ज निकाली काढताना मथुरा जिल्हा न्यायालयाला मनीष यादव यांच्या अर्जावर 4 महिन्यांत सुनावणी पूर्ण करून निकाल देण्याचे निर्देश दिले.
Join Our WhatsApp Community