‘मध्य रेल्वे लाईन’ वरुन जाणारे ४ पूल आणि ‘पश्चिम रेल्वे लाईन’ वरुन जाणारे ९ पूल हे अतिशय जुने झाल्याने अतिशय धोकादायक बनले आहे. या १३ पुलांपैकी काही पुलांची दुरुस्तीची कामे सुरु आहेत किंवा पावसाळ्यानंतर सुरु करण्यात येत असल्याने या धोकादायक पुलांवरून गणेश आगमन व विसर्जन मिरवणुकांमध्ये ध्वनीक्षेपक वाजवण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे या धोकदायक पुलांवर वाजवा रे वाजवा म्हणत नाचता येणार नाही.
( हेही वाचा : गणेश आगमन -विसर्जन मार्गावर खड्डेच… तातडीने खड्डे बुजवण्याची भाजपची मागणी )
१३ पूल धोकादायक
श्री गणेशोत्सवाच्या अनुषंगाने मुंबईतील सर्व गणेश भक्तांना व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना आवाहन करण्यात आले आहे. यामध्ये ‘मध्य रेल्वे लाईन’ वरुन जाणारे ४ पूल आणि ‘पश्चिम रेल्वे लाईन’ वरुन जाणारे ९ पूल हे अतिशय जुने झाल्याने धोकादायक स्वरुपाचे झालेले आहेत. तसेच, या १३ पुलांपैकी काही पुलांची दुरुस्तीची कामे सुरु आहेत किंवा पावसाळ्यानंतर सुरु करण्यात येणार आहेत. त्यामुळे गणेश भक्तांनी, श्रीगणेश आगमन आणि विसर्जनासाठी पुलावरुन जाताना ध्वनिक्षेपकाचा वापर करु नये तसेच नाच-गाणी इत्यादी बाबी टाळाव्यात. त्याचबरोबर पुलावर अधिक वेळ न थांबता पुलांवरुन त्वरित पुढे जावे. या अनुषंगाने मुंबई महानगरपालिका व मुंबई वाहतूक पोलिस यांच्याद्वारे देण्यात येणा-या सुचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे मुंबई महानगरपालिकेच्या प्रमुख अभियंता (पूल) यांच्याद्वारे कळविण्यात आले आहे.
गणेशभक्तांना आवाहन
‘मध्य रेल्वे लाईन’ वरुन जाणा-या ४ पुलांमध्ये घाटकोपर रेल ओव्हर ब्रिज, करीरोड रेल ओव्हर ब्रिज, साने गुरुजी मार्ग (आर्थर रोड) रेल ओव्हर ब्रिज, भायखळा रेल ओव्हर ब्रिज या पुलांचा समावेश आहे. तर, ‘पश्चिम रेल्वे लाईन’ वरुन जाणा-या ९ पुलांमध्ये मरिन लाईन्स रेल ओव्हर ब्रिज, ग्रँटरोड व मुंबई सेंट्रलच्या दरम्यान असणारा फॉकलंड रेल ओव्हर ब्रिज, मुंबई सेंट्रलच्या जवळ असणारा बेलासिस पूल, महालक्ष्मी स्टील रेल ओव्हर ब्रिज, प्रभादेवी कॅरोल रेल ओव्हर ब्रिज, दादर टिळक रेल ओव्हर ब्रिज यांच्यासह ग्रँटरोड व चर्नीरोडच्या दरम्यान असणारे सँडहर्स्ट रोड रेल ओव्हर ब्रिज, फ्रेंच रेल ओव्हर ब्रिज आणि केनडी रेल ओव्हर ब्रिज या पुलांचा समावेश आहे.
करीरोड रेल ओव्हर ब्रिज, साने गुरुजी मार्ग (आर्थर रोड) रेल ओव्हर ब्रिज किंवा चिंचपोकळी रेल ओव्हर ब्रिज आणि भायखळा रेल ओव्हर ब्रिज या पुलांवर एकावेळेस १६ टनांपेक्षा अधिक वजन होणार नाही, याची काळजी घेण्याचेही आवाहन गणेश भक्तांना करण्यात आले आहे. तसेच ‘मध्य रेल्वे लाईन’ वरील चिंचपोकळी रेल ओव्हर ब्रिज (आर्थर रोड) आणि करीरोड रेल ओव्हर ब्रिज पार करताना मुंबई महानगरपालिका व मुंबई पोलिस यांच्याद्वारे देण्यात आलेल्या व वेळोवेळी देण्यात येणा-या सूचनांचे काटेकोरपणे पालन करुन सहकार्य करण्याची विनंती देखील करण्यात येत आहे.
दरम्यान, भाजपचे महापालिका माजी गटनेते प्रभाकर शिंदे यांनी मुंबईतील गणेश विसर्जनाच्या मार्गावर असलेल्या १३ धोकादायक रेल्वे उड्डाणपुलाच्या बाबतीत गंभीरपणे विचार करून त्याबाबत आवश्यक ती खबरदारी घ्यावी अशी मागणी महापालिका आयुक्त तथा प्रशासक इक्बालसिंह चहल यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
Join Our WhatsApp Community