कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती निवळली असून निर्बंधमुक्त वातावरणात सर्व व्यवहार सुरू झाला आहे. ही बाब लक्षात घेऊन चतुरंग प्रतिष्ठानतर्फे गेल्या दोन वर्षातील आणि यंदाच्या जीवनगौरव पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. प्रतिष्ठानने ख्यातकीर्त दिग्दर्शक दत्तात्रय अंबादास मायाळू तथा राजदत्त यांना २०२० चा, साहित्यग्रंथ निर्मितीचे संशोधनात्मक कार्य करणारे डॉ. प्रभाकर मांडे यांना २०२१ चा, तर प्रख्यात दुर्गभ्रमक – गिर्यारोहक बाळकृष्ण उर्फ आप्पा परब यांना २०२२ चा जीवनगौरव पुरस्कार जाहीर केला आहे. चतुरंग प्रतिष्ठानतर्फे १९९९ पासून जीवनगौरव पुरस्कार देण्यात येत आहे. मात्र कोरोना संसर्गामुळे गेली दोन वर्षे पुरस्काराची घोषणा करण्यात आली नव्हती. आता परिस्थिती निवळली असून जीवनगौरव पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे.
सन्मानचिन्ह, मानपत्र आणि प्रत्येकी तीन लाख रुपये असे चतुरंग जीवनगौरव पुरस्काराचे स्वरुप असून या तिन्ही पुरस्कारांच्या निवडीचे काम डॉ. विनय सहस्रबुद्धे यांच्या अध्यक्षतेखाली वासुदेव कामत, अरूण नलावडे, विनायक परब, सुधीर जोगळेकर, डॉ. अजय वैद्य, डॉ. अरविंद जामखेडकर, डॉ. मिलिंद कांबळे, डॉ. नितीन करमळकर, डॉ. कविता रेगे, सौ. मंजिरी मराठे यांनी काम पाहिले. येत्या डिसेंबरमध्ये तीन ठिकाणी होणाऱ्या वेगवेगळ्या रंगसंमेलनात मायाळू, मांडे आणि परब यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
(हेही वाचा अनिल परबांना मोठा धक्का, अखेर साई रिसॉर्ट पाडण्याचे ठरले….)
दोन वर्षांनंतर झाली पुरस्कारांची घोषणा
- चित्रपट क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल, तसेच समाजातील अनेक घटकांचा साकल्याने अभ्यास करून त्यास कलात्मक जोड देत, अनेक समाजाभिमुख चित्रपट, महानाट्य आणि माहितीपटांच्या निर्मितीचे मूलभूत काम करणारे ९० वर्षीय ख्यातकीर्त दिग्दर्शक दत्तात्रय अंबादास मायाळू तथा राजदत्त यांची २०२० च्या जीवनगौरव पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
- शिक्षण क्षेत्रातील पायाभूत अशा वैशिष्ट्यपूर्ण योगदानाबद्दल, तसेच विद्यापिठीय पातळीवर आणि अभ्यासकांच्या पातळीवर लोकसाहित्य, लोकसंस्कृती, लोकजीवन, लोककला या विषयांचा अधिकाधिक शास्त्रपूत अभ्यास व विचार लोकसाहित्य संशोधन मंडळाच्या माध्यमातून सातत्याने मांडण्याचे आणि संदर्भित साहित्यग्रंथ निर्मितीचे संशोधनात्मक कार्य करणारे सावरखेड, औरंगाबाद येथील डॉक्टर प्रभाकर मांडे (९०) यांना २०२१ चा जीवनगौरव पुरस्कार घोषित करण्यात आला आहे.
- गिर्यारोहण आणि दुर्गसंवर्धन क्षेत्रातील अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान, शिवकाल, नाणकशास्त्र, युद्धेतिहास यावरील तपशिलात्मक लेखन आणि अनेक पुस्तकांच्या निर्मिती कार्याबद्दल, तसेच दुर्गभ्रमणाच्या माध्यमातून गडकिल्ले व ऐतिहासिक वास्तूंशी निगडीत घटकांचा साकल्यपूर्ण अभ्यास करणारे ८३ वर्षीय दुर्भभ्रमक – गिर्यारोह बाळकृष्ण उर्फ आप्पा परब यांना यंदाचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
(हेही वाचा मोहित कंबोज यांच्या तक्रारीवरून विद्या चव्हाण अडचणीत)
Join Our WhatsApp Community