मनसे-भाजप युती होणार? राज ठाकरेंच्या भेटीनंतर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितले

123

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप-मनसे एकत्रित निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा गेल्या काही महिन्यांपासून करण्यात येत आहेत. त्यातच मंगळवारी भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शीवतीर्थावर भेट घेतल्यामुळे या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे. पण ही केवळ सदिच्छा भेट असून त्याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करू नये, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.

राज ठाकरे फायटर नेते

राज ठाकरेंसोबत भाजप नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्याचे दिसत आहे. सोमवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंची गुप्त भेट घेतल्याची चर्चा ताजी असतानाच, चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. यावेळी बावनकुळे यांनी राज ठाकरेंना फायटर नेते म्हणत त्यांचे कौतुक केले आहे.

राजकीय रंग देऊ नये

माझे आणि राज ठाकरेंचे कौटुंबिक संबंध फार जुने आहेत. राज ठाकरे हे कायमंच हिंदुत्वाची भूमिका प्रभावीपणे मांडत आले आहेत. हिंदुत्वाची भूमिका पुढे घेऊन जाणा-या नेत्यांपैकी राज ठाकरे हे आघाडीचे नेते आहेत, असे बावनकुळे यांनी सांगितले. तसेच ही केवळ सदिच्छा भेट असून त्याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करू नये, असेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे.

युती होणार?

मनसे-भाजप युतीच्या बाबतीत विचारले असता त्याबाबतचे सर्व निर्णय हे केंद्रीय नेतृत्वाकडून घेण्यात येतील, असे बावनकुळे म्हणाले. दरम्यान, अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा हे लवकरच मुंबई दौरा करणार असल्यामुळे या दौ-यात मनसे-भाजप युतीवर शिक्कामोर्तब होते का, हे पाहणे आता महत्वाचे असणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.