देशात दर तासाला होतात तीन बलात्कार, NCRB च्या अहवालातून धक्कादायक माहिती समोर

153

देशात महिलांवर होणा-या अत्याचारांच्या घटना या दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असतानाच आता नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्यूरो(NCRB)ने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीवरुन धक्कादायक माहिती समोर आली आहे. 2021 मध्ये देशभरात महिलांबाबतच्या गुन्ह्यांमध्ये 4.28 लाखपेक्षा जास्त गुन्ह्यांची नोंद झाली आहे. या आकडेवारीनुसार देशात प्रत्येक तासाला सरासरी तीन महिलांवर बलात्कार होत असल्याचे सांगण्यात येत आहे.

केंद्र सरकारची संस्था असलेल्या NCRB ने 2021 चा गुन्हे नोंदणीबाबतचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. यामध्ये 2021 या वर्षी देशभरात 60.96 लाख गुन्हेगारी स्वरुपाचे गुन्हे नोंदवले गेल्याचे सांगण्यात येत असून यामध्ये महिलांवरील अत्याचारांचे प्रमाणही अधिक असल्याचे निदर्शनास येत आहे.

बलात्काराचे इतके गुन्हे दाखल

2021 मध्ये बलात्काराचे 31 हजार 677 गुन्हे दाखल झाले असून बलात्काराच्या प्रयत्नाचे 3 हजार 800 गुन्हे दाखल झाले आहेत. धक्कादायक गोष्ट म्हणजे या घटनांमध्ये 97 टक्के आरोपी हे पीडितेच्या किंवा तिच्या कुटुंबीयांच्या परिचयाचे असल्याचे अहवालात सांगण्यात येत आहे. तर 2 हजार 24 प्रकरणांमध्ये कुटुंबातील सदस्यच बलात्कार करणारा होता, असे सांगण्यात आले आहे.

काय आहे आकडेवारी?

60.96 लाख गुन्ह्यांपैकी 36.63 लाख गुन्हे हे भारतीय दंड संहिता(IPC) अंतर्गत नोंदवण्यात आले आहेत. विशेष म्हणजे 2021 मध्ये 2020 च्या तुलनेत 8 टक्के कमी गुन्ह्यांची नोंद झाली आहे. 2020 मध्ये 66 लाखांहून अधिक गुन्ह्यांची नोंद झाली होती. 2021 मध्ये 29 हजार 272 हत्येचे गुन्हे दाखल झाले असून यानुसार दरदिवशी 80 हत्या होत असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. वादाच्या कारणामुळे यातील बहुतांशी हत्या झाल्या असल्याचे सांगण्यात येत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.