ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून लेप्टो आणि मलेरियाच्या रुग्णसंख्येत वाढ झालेली आहे. २८ ऑगस्टपर्यंत मुंबईत तब्बल ७३६ मलेरियाचे रुग्ण आढळल्याची माहिती पालिका आरोग्य विभागाने दिली. लेप्टोच्या रुग्णांची संख्याही ६१ वर पोहोचल्याने आरोग्य विभागासमोर आव्हान उभे राहिले आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून पाऊस गायब असला तरीही लेप्टोच्या रुग्णांची वाढती संख्या आता मुंबईकरांच्या आरोग्यासाठी धोक्याची घंटा समजली जात आहे.
( हेही वाचा : ID आणि Password हॅक झाला तर काय कराल?)
मलेरियासह डेंग्यूच्या रुग्णांची संख्या १४७ पर्यंत पोहोचल्याची माहितीही आरोग्य विभागाने दिली. पालिकेच्या मृत्यू अहवाल समितीच्या तपासणीत यंदाच्या वर्षांत मलेरिया आणि डेंग्यूमुळे पावसाळी ऋतुमानात प्रत्येकी दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
मलेरियाच्या रुग्णांपाठोपाठ वाढती गॅस्ट्रो रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. गॅस्ट्रोच्या ४४४ रुग्णांची २८ ऑगस्टपर्यंत नोंद झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. त्याखालोखाल स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्याही १८३ तर हेपेटायटीसच्या रुग्णांची नोंद ५१ वर पोहोचली आहे. चिकनगुनियाचेही आता ३ रुग्ण आढळल्याची माहिती पालिका आरोग्य विभागाने दिली.
स्वाईन फ्लू आणि लेप्टोबाबत माहिती जाणून घ्या
स्वाईनफ्लूच्या आजाराची लक्षणे
ताप, डोकेदुखी, अंगदुखी, घसादुखी, खोकला, थकवा, लहान मुलांमध्ये उलटी व जुलाब ही लक्षणे आढळतात.
स्वाईन फ्लू आजाराच्या प्रसाराचे माध्यम व निदान
इन्फ्लूएन्झा या विषाणूमुळे स्वाईन फ्लू आजार होतो. हवेच्या माध्यमातून स्वाईन फ्लू पसरतो. आजारी व्यक्तीच्या शिंकण्यातून तसेच खोकल्यातून उडणा-या थेंबावाटे या आजाराचे विषाणू एका रुग्णापासून निरोगी व्यक्तीकडे जातात. किमान एक ते सात दिवसांत स्वाईन फ्लूची लागण होते.
आरटीपीसीआर तपासणीतून राज्यातील तीन आरोग्य केंद्रात स्वाईन फ्लूच्या रुग्णांचे निदान केले जाते. पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था, मुंबईतील हाफकिन संशोधन संस्था तसेच कस्तुरबा संसर्गजन्य आजार रुग्णालयात ही चाचणी उपलब्ध आहे.
अतिजोखमीच्या व्यक्ती
- ५ वर्षांखालील मुले.
- ६५ वर्षांखालील प्रौढ व्यक्ती.
- दमा, हृदयाचे आजार, मूत्रपिंडाचे विकार, मधुमेह, यकृताचे विकार, रक्त किंवा चेतासंस्थांचे विकार असलेल्या रुग्णांना स्वाईन फ्लूची बाधा होण्याची दाट शक्यता असते.
- सततच्या आजारपणामुळे रोग प्रतिकारकशक्ती कमी झालेल्या, स्टॅरोईड्स प्रकारातील औषधे दीर्घ काळापासून घेणा-या व्यक्ती, एचआयव्ही बाधित रुग्ण.
- गरोदर महिला किंवा स्थूल व्यक्ती.
उपचार
- ऑसेलटॅमीवीर व झानामीवीर ही औषधे उपचारासाठी उपलब्ध आहेत. तसेच इंजेक्शनद्वारे तसेच नेसल स्प्रे स्वरुपातील लस उपलब्ध आहे.
काय टाळाल… - सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, धुम्रपान टाळा, लक्षणे आढळल्यास गर्दीत मिसळू नका.
प्रतिबंधात्मक उपाय
- सार्वजनिक ठिकाणी थुंकणे टाळा.
- डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेऊ नका.
- गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा.
- वारंवार हात स्वच्छ धुवा, पौष्टिक आहाराचे सेवन करा.
- लिंबू, आवळा, मोसंबी, संत्री, हिरव्या पालेभाज्यांचे सेवन वाढवा.
- धूम्रपान टाळा.
- पुरेशी झोप आणि विश्रांती घ्या.