राज्यभरात गणोशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा होत आहे. त्यातच कोकणातील गणेशोत्सवाचा थाट तर काही औरच असतो. पण कोकणातील एका गावात असे गणपती मंदिर आहे जिथे गणेश चतुर्थीला नाही तर दिवाळीला गणपतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होते. दिवाळीला लक्ष्मीची पूजा सर्वत्र केली जाते. मात्र कोकणातील या गावात असलेल्या गणपती मंदिरात दिवाळीला लक्ष्मी पूजनादिवशी गणपतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. कोकणातील वेंगुर्ला तालुक्यातील उभादांडा या गावात हे अनोखे गणेश मंदिर आहे.
गणपती हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात गणपतीचे अनेक जागृत मंदिरे आढळतात. बहुतांश गणेश मंदिरांमध्ये गणपतीची मूर्ती कायमस्वरुपी प्रतिष्ठापित केली जाते. मात्र उभादांडा येथील गणेश मंदिर मात्र याला अपवाद आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे दिवळीमध्ये लक्ष्मीपूजनादिवशी येथे गणेशाची प्रतिष्ठापना होते.
( हेही वाचा: गणेश आगमनाच्याच दिवशी मश्रूम गणपती मंदिरावरील सोन्याचा कळस चोरीला, भाविक संतप्त )
कोकणातील घराघरांमध्ये गणेशोत्सव ज्याप्रमाणे पारंपारिक आरास करुन केला जातो. त्याचप्रमाणे या गणपतीची प्रतिष्ठापना केली जाते. येथील गणेशाची मूर्ती ही मातीची असते. गावातील गणपतीच्या चित्रशाळेतून लक्ष्मीपूजनादिवशी वाजत गाजत गणेश मूर्ती आणून मंदिरात बसवली जाते.
पर्यटकांमध्ये आकर्षणाचे केंद्र
या गणपतीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या गणेशमूर्तीचे विसर्जन 5 किंवा 21 दिवसांनी होत नाही. तर येथील गणेश मूर्तीचे विसर्जन हे शिमग्यामध्ये होते. विसर्जन झाल्यानंतर पुढच्या दिवाळीपर्यंत येथील मंदिरात गणेशाच्या फोटोची पूजा केली जाते. असे हे आगळे वेगळे गणेश मंदिर वेंगुर्ला येथील बस स्टॅंडपासून काही मिनिटांच्या अंतरावर आहे. त्यामुळे हे मंदिर भाविक आणि पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरते. तसेच रेडी येथील प्रसिद्ध द्विभूज गणपतीही येथून काही किलोमीटर अंतरावर आहे.
Join Our WhatsApp Community