फुटीच्या भीतीने उपनेते पदाची माळ शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या गळ्यात

153

एकनाथ शिंदे शिवसेनेतून ४० आमदार आणि १२ खासदारांना घेऊन बाहेर पडल्यानंतर आता बऱ्याचे जणांना सुगीचे दिवस आले आहेत. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपण शिवसेनेतच असून आमची शिवसेना मूळ शिवसेना असल्याचा दावा केला. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी संघटनात्मक रिक्त जागा भरत नेते आणि उपनेतपदाच्या माळा पदाधिकाऱ्यांच्या गळ्यात टाकण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे बाहेरुन आलेल्यांना उपनेतेपद दिले जात असल्याने माजी महापौरांसह अनेकांच्या मनात जी खदखद होती आणि काही शिंदे यांच्या संपर्कात आल्यास निघून जातील या शक्यता हेरून पक्षप्रमुखांनी उपनेत्यांची नवीन यादी जाहीर केली.

उद्धव ठाकरेंकडून निष्ठावंतांवर अन्याय

यामध्ये बाहेरुन आलेल्यांना मानाचे पान देतानाच आमदार रविंद्र वायकर, सुनील प्रभू, अजय चौधरी यांच्यासारख्या निष्ठावाना शिवसैनिकांना या संघटनात्मक पदापासून दूर ठेवले आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचा एक गट बाजुला काढून राज्यात भाजपसोबत युती करत सरकार स्थापन केले. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर मूळ शिवसेनेवरच दावा करत आपल्याकडे असलेल्या ४० आमदारांसह १२ खासदार आणि पदाधिकाऱ्यांच्या जोरावर मूळ शिवसेना आपलीच असल्याचे सांगितले. शिवसेना नक्की कुणाची याबाबत न्यायालयात सुनावणी सुरु असून लवकरच याबाबत निर्णय घेतला जाईल. मात्र, मूळ शिवसेनेबाबत प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना शिवसेना पक्षप्रमुख हे शिवसेना नेते आणि उपनेते पदाच्या, पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती करत आहेत. यापूर्वी काँग्रेसमधून आलेल्या मनोज जामसूतकर, आंबेडकर चळवळीच्या नेत्या सुषमा अंधारे यांना उपनेतेपद बहाल केले.

(हेही वाचा भाजपाचा मनसेला टाळी देण्याचा प्रयत्न, सलग तीन नेत्यांनी राज ठाकरेंची घेतली भेट)

टीका करणा-यांना मानाचे स्थान

त्यानंतर उपनेते असलेल्या अरविंद सावंत यांना बढती देत शिवसेना नेते बनवले, तर शिवसेना सोडून राष्ट्रवादी गेलेल्या आणि पुन्हा शिवसेनेत आलेल्या भास्कर जाधव यांनाही शिवसेना नेते पद बहाल केले. विशेष म्हणजे ज्या सुषमा अंधारे आणि भास्कर जाधव यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि शिवसेना नेते युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर टिका केली, त्यांना पक्षात आल्यावर मानाचे पान देण्यात आले. त्यानंतर लिलाधर डाके यांची सचिवपदी नियुक्ती करण्यात आली. विशेष म्हणजे मागील अनेक वर्षांपासून लिलाधर डाके यांनी आपल्या मुलाला कुठे तरी नोकरी लागावी म्हणून शिवसेना पक्षप्रमुखांकडे विनंती केली होती. परंतु मागील अनेक महिन्यांपासून पक्षप्रमुखांचे लक्ष नाही. परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना नेते लिलाधर डाके यांची सदिच्छा भेट देताच त्यांच्या मुलाला सचिवपदी नियुक्त करण्यात आले आहे.

शिंदे गटाच्या भीतीने नियुक्त्या

त्यानंतर आता माजी महापौर किशोरी पेडणेकर, माजी महापौर दत्ता दळवी, माजी नगरसेवक व कोल्हापूरचे संपर्कप्रमुख अरूण दुधवडकर, युवा सेनेचे सरचिटणीस अमोल किर्तीकर यांच्यासह ज्योती ठाकरे, पक्षाच्या प्रवक्त्या संजना घाडी, आशा मामेडी आदींची शिवसेनेच्या उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यातील संजना घाडी आणि आशा मामेडी या मनसे रिटर्न आहेत, तर माजी महापौर दत्ता दळवी हे शिंदे यांच्या गटात सामील होतील या भीतीने त्यांना हे पद देण्यात आले आहे. मागील अनेक वर्षांपासून दळवी हे पक्षापासून अंतर ठेवून असून त्यांना जाणीवपूर्वक लांब ठेवण्याचे काम संघटनेचे पदाधिकारी करत आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांना दिलेले उपनेतेपद हे शिवसैनिकांना ३८० अंशात विचार करण्यासारखी घटना आहे.

(हेही वाचा स्वातंत्र्यपूर्व काळाचा इतिहास लाभलेला असाही अनोखा गणेशोत्सव)

म्हणून माजी महापौरांना उपनेते पद

शिवसेना खासदार गजानन किर्तीकर यांचे पूत्र अमोल हे युवा सेनेचे सरचिटणीस असून युवा सेनेत त्यांचे वर्चस्व असले तरी शिवसेनेत त्यांना काही किंमत नव्हती. परंतु मागील महिन्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदार गजानन किर्तीकर यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीनंतर शिवसेनेत खळबळ माजली आणि युवा सेनेत सक्रीय असलेल्या अमोलभैय्यांना उपनेतेपदाची लॉटरी लागली. किर्तीकर शिंदे गटासोबत गेल्यास अमोलही तिथे जाईल, या भीतीने हे पद त्यांना देण्यात आल्याचे बोलले जात आहे. तर सुषमा अंधारे आणि ठाण्याच्या रणरागिणी अनिता बिर्जे यांना उपनेते बनवल्यामुळे मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या मनात चलबिचल सुरु झाली होती. त्यांना जर उपनेते बनवले जाते तर मग मी इथे विरोधकांना शिंगावर घेऊनही माझा विचार होत नाही, असा काही सूर मनात आळवणाऱ्या पेडणेकर यांची ही नाराजी ओळखून पक्षप्रमुख आणि विशेषत: रश्मी वहिनींनी पुढाकार घेत महापौरपदाप्रमाणेच उपनेतेपदाची माळ त्यांच्या गळ्यात घातल्याचे बोलले जात आहे.

पदाधिका-यांच्या नियुक्त्यांवर प्रश्नचिन्ह

माजी बेस्ट समिती अध्यक्ष व माजी नगरसेवक तसेच कोल्हापूर-सिंधुदुर्गांचे पालकमंत्री अरूण दुधवडकर यांचीही उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली. कणकवली, वैभववाडी विधान सभेतून शिवसेनेच्यावतीन अरूण दुधवडकर यांची उमेदवारी पक्की असताना आयत्या वेळी त्यांचा पत्ता कापून सतीश सावंत यांना पक्षात घेऊन नितेश राणे यांच्या विरोधात उभे केले. यानंतर कोल्हापूरच्या पोटनिवडणुकीत ज्याचा सिंहाचा वाटा होता, त्या दुधवडकरांना बाजुला करत कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली. परंतु एवढे अन्याय होऊनही शिवसेनेसोबत एकनिष्ठेने राहणाऱ्या दुधवडकर यांना खऱ्या अर्थाने सन्मान झाल्याचे शिवसैनिकांमधून ऐकायला येत आहे. दरम्यान शिवसेना कुणाची याबाबत सुरु असलेल्या न्यायप्रविष्ठ प्रकरणांमुळे पक्षप्रमुखांनी केलेल्या या शिवसेना नेते आणि उपनेतेपदाच्या नियुक्तीला आव्हान दिले जाण्याची शक्यता किंबहुना या नियुक्त्या ग्राह्य धरल्या जावू शकत नसल्याचे काही राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.

(हेही वाचा भाजपाचा मनसेला टाळी देण्याचा प्रयत्न, सलग तीन नेत्यांनी राज ठाकरेंची घेतली भेट)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.