आगामी मुंबई महापालिका निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली आहे. महाराष्ट्रातील भाजपच्या प्रमुख नेत्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर भाजप-मनसे युतीच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे. अशातच आता खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज ठाकरे यांची भेट घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे महापालिका निवडणूक शिंदे गट-भाजप मनसेसोबत लढवणार का, अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.
मुख्यमंत्री शिवतीर्थवर?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज ठाकरेंचे निवासस्थान शिवतीर्थ येथे जाऊन बाप्पाचे दर्शन घेणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यावेळी या दोन्ही नेत्यांमध्ये मुंबई महापालिका निवडणुकांबाबत चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी देखील बुधवारी राज ठाकरे यांच्या घरी जाऊन बाप्पाचे दर्शन घेतले होते. तसेच याआधी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील राज ठाकरे यांची भेट घेतली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यात गुप्त भेट झाल्याचे सांगण्यात येत होते. त्यामुळे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या भेटीगाठी महत्वपूर्ण असल्याचे मानले जात आहे.
(हेही वाचाः बच्चू ‘कडू’ का झाले, सत्तारांचे मिश्कील विधान)
उद्धव ठाकरेंसमोर आव्हान?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा आवाज उठवला आहे. शिंदे गटाने देखील हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन उद्ठव ठाकरे यांच्या शिवसेनेतून उठाव केला होता. तसेच हिंदुत्व हा भाजपचा सुरुवातीपासूनचा नारा आहे. त्यामुळे हे तिघंही एकत्र येऊन महापालिका निवडणुका लढवू शकतात, असे देखील बोलले जात आहे. तसे झाल्यास गेल्या 25 वर्षांपासून मुंबई महापालिकेत सत्तेत असलेल्या उद्धव ठाकरेंसमोर मोठे आव्हान उभे राहणार असल्याचे सांगितले जात आहे.
Join Our WhatsApp Community