एकनाथ शिंदे गटात सहभागी झालेले रामदास कदम आता चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेनाप्रमुखांचा मुलगा म्हणून किती दिवस राज्याला ब्लॅकमेल करणार आहात, असा थेट प्रश्न रामदास कदम यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना केला आहे. पहिल्यांदाच शिंदे गटातील एका मोठ्या नेत्याने थेट उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले असून त्यांनी त्यांची भावनिक डायलॉगबाजी थांबवावी, असेही रामदास कदम यांनी म्हटले आहे. तर सत्तेसाठी शरद पवारांच्या मांडीवर जाऊन बसलात, तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांची आठवण झाली का, असा सवालदेखील रामदास कदम यांनी विचारला आहे.
(हेही वाचा – निवडणुका, जनगणनेनंतर ST आगारात शिक्षक करणार चाकरमान्यांसाठी चहा वाटपाचं नियोजन)
रामदास कदम यांनी शिवसेनेच्या नेते पदाचा राजीनामा दिल्यानंतर उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल चढवला होता. यावेळी कदम म्हणाले की, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी माझी शिवसेना नेते पदी नियुक्ती केली होती. मात्र शिवसेना प्रमुखांच्या निधनानंतर नेते पदाला कोणतीही किंमत राहिली नाही, हे मला पाहायला मिळाले. तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर आपल्या व्यस्त कार्यक्रमातून शिवसेना नेत्यांना विश्वासात घेण्याचे काम आपल्याकडून कधीही झाले नाही. उलट मला आणि माझा मुलगा आमदार योगेश कदम याला अनेकदा अपमानित करण्यात आले, याचीही खंत त्यांनी व्यक्त केली.
आता दौरे का, तेव्हा का केले नाहीत
राज्यातील सत्ता गेल्यानंतर आता उद्धव ठाकरे राज्याचा दौरा करणार आहेत. आता जाणीव झाल्यानंतर सगळ्या शिवसेना नेत्यांच्या भेटी-गाठी सुरू झाल्या आहेत. मग गेली अडीच वर्षे सत्तेत असताना काय झाले होते, तेव्हा का काही केले नाही, आता दौरे कशासाठी, असा प्रश्न देखील त्यांनी उद्धव ठाकरेंना विचारला आहे. यावेळी उद्धव ठाकरेंच्या महाराष्ट्र दौऱ्यानंतर आपणही राज्याचा दौरा करणार असल्याचे रामदास कदम यांनी जाहीर केले आहे. नेमके काय घडले आहे, ही वस्तुस्थिती राज्यातील जनतेला सांगणार असल्याचे रामदास कदम यांनी सांगितले आहे.
Join Our WhatsApp Community