सुप्रसिद्ध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या परिसरातील वाढती गर्दी; विशेष उपाययोजना करण्याची खासदारांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

116

कोरोनाचे सावट दूर झाल्याने दोन वर्षांनंतर राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरा केल्या जाणाऱ्या गणेशोत्सवात भाविकांची मोठी गर्दी होताना दिसते आहे. याच वर्षी देशभरातील तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी गर्दीमुळे झालेल्या अपघाती दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मानाच्या आणि सुप्रसिद्ध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या परिसरात गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी विशेष उपाययोजना करावी, अशी लेखी मागणी शिवसेना लोकसभा गटनेते खासदार राहुल शेवाळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

( हेही वाचा : मंत्रिमंडळाचा दुसरा विस्तार लांबणार, कारण…)

गणेशोत्सवात विशेष खबरदारी घेणे आवश्यक

खासदार शेवाळे यांनी आपल्या निवेदनात असे म्हटले आहे की, यंदाच्या वर्षी कोरोनाचे संकट दूर झाल्याने देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. देशभरातील नागरिकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या मंदिरांमध्ये देखील भाविकांच्या गर्दीचा आकडा दररोज नवनवे विक्रम पार करताना दिसतोय.

मात्र, या उत्साही आणि भक्तिमय वातावरणात देशभरात काही दुर्दैवी अपघाती घटनाही घडल्या आहेत, ही खेदाची बाब आहे. या वर्षीच्या जानेवारी महिन्यापासून आत्तापर्यंत जम्मू – काश्मीर येथील माता वैष्णोदेवी, राजस्थान मधील खाटूश्यामजी मंदिर,मथुरेतील बाके बिहारी मंदिर या तीर्थस्थळांच्या परिसरात अलोट गर्दीमुळे भाविकांना प्राण गमवावे लागले होते, तसेच या गर्दीमुळे अनेक भाविक जखमी झाले होते. चारधाम यात्रेदरम्यान यावर्षी केदारनाथ आणि बद्रिनाथ या तीर्थ स्थळांवर दरवर्षीच्या तुलनेत दुपटीहून अधिक भाविकांची उपस्थिती नोंदवली गेली.या सर्व बाबी लक्षात घेता, यंदाच्या वर्षी महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा होणाऱ्या गणेशोत्सवात विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे, अशी मागणी खासदार शेवाळे यांनी केली आहे.

खासदार शेवाळे यांचे निवेदन

यासाठी स्थानिक पोलीस, शासकीय अधिकारी, सामाजिक संस्था आणि गणेशोत्सव मंडळ यांच्यात समन्वय साधून एक नियोजनबद्ध आराखडा तयार करण्याचे आदेश संबधित यंत्रणांना देण्यात यावेत, तसेच मुख्यमंत्र्यांनी स्वतः यासंदर्भात जनतेला आवाहन करावे, अशीही मागणी त्यांनी आपल्या निवेदनात खासदार शेवाळे यांनी केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.