लालबाग परळ विभागात लाडक्या बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. मुंबई तसेच बाहेरून खाजगी वाहनातून येणाऱ्या गणेशभक्तांची मोठी संख्या असल्यामुळे वाहने कुठे पार्क करावी असा प्रश्न वाहनधारकांना पडत असल्यास आता चिंता करायची गरज नाही. मुंबई पोलीस वाहतूक विभागाने या परिसरात वाहन पार्किंगची सोय केली आहे. मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाने परळ, लालबाग, काळाचौकी आणि भायखळा या चार ठिकाणी भाविकांची वाहने पार्किंग करण्याची सोय करण्यात आलेली असून दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी या ठिकाणी आपले वाहन पार्क करावे असे आवाहन वाहतूक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त डॉ. महेश पाटील यांनी केले आहे.
( हेही वाचा : Zomato Project : आता दुसऱ्या शहरांमधून मागवता येतील पदार्थ; झोमॅटोने खाद्यप्रेमींसाठी लॉंच केला ‘इंटरसिटी लीजेंड’ प्रकल्प)
दीड दिवसाच्या गणपती बाप्पाच्या विसर्जनानंतर मुंबईतील परळ लालबाग या परिसरात गणेश दर्शनासाठी भाविकांची संख्या वाढू लागली आहे, खाजगी वाहनातून येणारे भाविक रस्त्याच्या कडेला तसेच इतर मोकळ्या ठिकाणी वाहने उभी करून दर्शनाला जातात. मात्र रस्त्यावर पार्क करण्यात आलेल्या वाहनांमुळे वाहतूक कोंडी होत असल्यामुळे मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाने या भागात ४ ठिकाणी वाहनतळाची सोय केली आहे.
४ ठिकाणी वाहनतळाची सोय
१) परळ येथील गांधी रुग्णालय येथील कल्पतरू पे अँड पार्क या ठिकाणी २०० वाहने पार्क करण्याची क्षमता आहे.
२) काळाचौकी ग.द.आंबेडकर मार्गावरील,एम.सी.जी.एम पे अँड पार्क या ठिकाणी ५०० वाहनांची क्षमता आहे.
३) कॉटनग्रीन पे अँड पार्क (बीपीटी) कॉटन ग्रीन रेल्वे स्थानक,काळाचौकी वाहन पार्किंग क्षमता ५ हजार वाहनाची.
४) एम.सी.जी.एम पे अँड पार्क (पेन्सुलिया लँड) डॉ. बी. ए.आंबेडकर रोड, बावला कंपाउंड जवळ भायखळा पूर्व या ठिकाणी ५०० वाहने पार्क करण्याची क्षमता आहे. या पार्किंग मध्ये भाविकांनी आपले वाहने पार्क करून निवांत दर्शन घ्यावे असे आवाहन वाहतूक विभागाकडून करण्यात आले आहे.