खरी शिवसेना कोणाची असा वाद न्यायप्रविष्ट असतानाच आता शिवसेनेची परंपरा असलेल्या दसरा मेळाव्याचा वाद देखील चिघळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदान अर्थात शिवतीर्थावर प्रथेप्रमाणे शिवसेनेचा दसरा मेळावा संपन्न होत असतो. पण शिवसेनेत झालेल्या फुटीनंतर आता शिंदे गटाकडून शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर देखील हक्क सांगण्यात येत आहे.
तसेच दस-याला मुंबईत हजर रहा, अशी सूचना देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिंदे गटातील आमदार-खासदारांना केली असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे हा वाद आता शिगेला पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच दसरा मेळावा घेण्यासाठी देखील शिंदे गटाला परवानगी मिळू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
(हेही वाचाः मी महाराष्ट्रात तुम्हाला नकोय का? फडणवीसांचा थेट सवाल)
दसरा मेळावा कुणाचा?
दसरा मेळाव्याचे आयोजन करण्याची परवानगी मिळावी म्हणून शिवसेनेने महापालिकेच्या जी-उत्तर विभागाला २२ ऑगस्ट २०२२ रोजी आपला अर्ज सादर केला आहे. पहिल्यांदाच शिवसेनेकडून इतक्या लवकर असा अर्ज प्रशासनाला करण्यात आला आहे. तसेच शिंदे गटानेही दसरा मेळाव्यावर आपला हक्क सांगितल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे शिवसेनेचा पारंपारिक दसरा मेळावा शिवतीर्थावर घेण्याचा मान नेमका कोणाला मिळणार, हे पाहणे आता गरजेचे असणार आहे.
पक्ष आणि चिन्हं कोणाचे?
दरम्यान, शिवसेनेचे पक्षचिन्ह आणि शिवसेना पक्ष यांवर शिंदे गटाकडून दावा करण्यात येत असून, याबाबतचा निर्णय आता न्यायप्रविष्ट आहे. पुढील सुनावणी होईपर्यंत पक्ष चिन्हाबाबत कोणताही निर्णय देऊ नये, अशा सूचना सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्रीय निवडणूक आयोगाला करण्यात आल्या आहेत.
(हेही वाचाः अमित शहा राज ठाकरेंना भेटण्याची शक्यता, मनसे-भाजप युतीबाबत होणार चर्चा?)
Join Our WhatsApp Community