सध्या सण, उत्सवांचा कालावधी सुरु आहे. या पार्श्वभूमीवर बाजार कृत्रिम फुलांनी सजला आहे. बाजारपेठ कृत्रिम फुलांनी सजल्यामुळे खऱ्या फुलांची मागणी कमी झाली आहे. फुलशेतीची मागणी कमी झाल्याने फुलांची शेती करणारे शेतकरी देशोधडीला लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यातच प्लास्टिक आणि कृत्रिम फुलांच्या सर्रास वापराबाबत शासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. सामाजिक कार्यकर्ते दिलीप डोळस यांनी या विषयावर लक्ष वेधले.
( हेही वाचा : रेल्वेत चोरांचा सुळसुळाट; ५ दिवसात १६९ मोबाईल लंपास)
फूल उत्पादक शेतकरी आणि व्यापारी हवालदिल
ते म्हणाले, महाराष्ट्र सरकारच्या आदेशानुसार प्लॅस्टिक बंदीची महाराष्ट्रात अंमलबजावणी होत नाही. संपूर्ण बाजारपेठ प्लॅस्टिक आणि थर्माकोलच्या वस्तूंनी भरली आहे. व्यापारी आपला व्यवसाय करतात. या उत्पादनांवर बंदी असताना या वस्तू बाजारात येतातच कशा ? त्यावर सरकारने उत्पादकांवर कारवाई करायला हवी, असे सामान्य व्यापारी वर्गाचे म्हणणे आहे. याबाबतीत महाराष्ट्र सरकार, पर्यावरण विभाग आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ निद्रिस्त असून यांना जागे करणे गरजेचे आहे. चायनीज कृत्रिम हारांचा बाजारात शिरकाव झाल्याने फुल उत्पादक शेतकरी आणि व्यापारी हवालदिल झाले असून या वर्षी कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. यावर आत्ताच सरकारने उपाययोजना केल्या नाहीत तर या शेतकऱ्यांनासुद्धा आत्महत्या कराव्या लागतील असे डोळस यांनी स्पष्ट केले आहे.
Join Our WhatsApp Community