येत्या काही काळात विमान वाहतूक हे देशातील दळणवळणाचे प्रमुख साधन बनेल असा विश्वास केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी व्यक्त केला. ते आज, शुक्रवारी पुण्याजवळील लवळे येथे सिंबायोसिस अभिमत विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी शिंदे म्हणाले की, देशांतर्गत विमान वाहतूक सर्वसामान्यांच्या आवाक्यात यावी यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न सुरू आहेत. त्या दृष्टिकोनातूनच विमानाच्या इंधनावरील व्हॅट कमी करण्याचं आवाहन सर्व राज्यांना केल्याचं सिंधिया यांनी स्पष्ट केलं.
(हेही वाचा – रेल्वेची आरक्षित तिकिटे रद्द केल्यास भरावा लागणार जीएसटी; प्रवाशांमध्ये नाराजी)
देशभरातील 22 राज्यांपैकी 16 राज्यांनी या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला. नागरी विमान वाहतूक म्हणजे नुसतीच विमानांची संख्या आणि विमानतळ नाही तर वाढती विमान संख्या आणि उड्डाणे लक्षात घेऊन त्यासाठी आवश्यक असणारे वैमानिक तयार करणे,अन्य कर्मचारीवर्ग उपलब्ध करून देणे हे देखील मंत्रालयाचे काम आहे त्यादृष्टीने मागील सहा महिन्यांत नऊ वैमानिक प्रशिक्षण देणाऱ्या संस्था सुरु झाल्या आहेत. तर येत्या दीड वर्षाच्या कालावधीत आणखी 15 संस्था सुरू केल्या जाणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. कृषी उड्डाण योजने अंतर्गत नाशवंत शेत मालाची जलद आणि सवलतीच्या दरात वाहतूक करण्याची योजना आहे गेल्या 2 वर्षात विमानाने होणाऱ्या माल वाहतुकीच्या प्रमाणात 19 टक्के पर्यंत वाढ झाल्याची माहिती शिंदे यांनी दिली.
तत्पूर्वी विद्यार्थ्यांना संबोधित करताना शिंदे यांनी नेतृत्वा साठी आवश्यक असणारे 5 प्रमुख गुण सांगितले. सफल नेता होण्यासाठी हृदयापासून आलेले धैर्य, मिळालेल्या संधीचे सोने करण्याची आक्रमक वृत्ती, टीम वर्क ,आणि सहकाऱ्यांच्या सुख दुःखात सहभागी होण्याची गरज असल्याचे म्हणाले. आपली मते इतरांवर लादणाऱ्या व्यक्ती कधीही यशस्वी नेता होऊ शकत नाहीत तर इतरांची बाजू समजून घेऊन त्यातून योग्य अयोग्य ठरवण्याची क्षमता नेत्यांमध्ये हवी असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी महात्मा गांधी आणि नेल्सन मंडेला यांची अनेक उदाहरणे दिली. छत्रपती शिवाजीमहाराजांच्या पवित्र भूमीत आल्याचा आपल्याला सार्थ अभिमान असल्याचे शिंदे म्हणाले. राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यावेळी उपस्थित होते.
Join Our WhatsApp Community