वाहतूक कोंडीतून नागरिकांची मुक्तता करणे हा शासनाचा संकल्प – मुख्यमंत्री

157

पुणे शहरातील वाहतूक कोंडीतून नागरिकांची मुक्तता करण्याचा शासनाचा संकल्प आहे. त्यासाठी उड्डाणपूलांची रखडलेली कामे, मेट्रो विस्ताराच्या कामांना गती, चांगले रस्ते उपलब्ध करून देणे यासोबतच सार्वजनिक बससेवेत सुधारणा करणे यावर शासनाचा भर असणार आहे. त्यादृष्टीने फेम २ अंतर्गत ई-बसची सुविधा महत्वाची ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

( हेही वाचा : रेल्वेची आरक्षित तिकिटे रद्द केल्यास भरावा लागणार जीएसटी; प्रवाशांमध्ये नाराजी)

पुणे स्टेशन ई-बस डेपो उद्घाटन आणि पुणे महानगर परिवहन महामंडळाला फेम २ अंतर्गत प्राप्त ९० ई-बसेसच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमाला केंद्रीय अवजड उद्योग मंत्री डॉ. महेंद्रनाथ पांडे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महानगर परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, ई-बसच्या वापरामुळे प्रवाशांना आरामदायी वाहतूक सेवा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे या बसेसचे नागरिकांकडून स्वागत होईल. पुणे उद्योग आणि विद्येचे माहेरघर आहे. सांस्कृतिक शहर आणि एक महानगर म्हणून पुण्याचा विस्तार होत आहे. त्यादृष्टीने सार्वजनिक वाहतूक मजबूत होणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने पीएमपीएमएलची बससेवा महत्वाची ठरणार आहे.

प्रदूषण विरहीत वाहतूकीसाठी ई-बससेवा महत्त्वाची

सार्वजनिक वाहतूक सुविधा प्रदूषण विरहीत होण्यासाठी ही बससेवा महत्वाची आहे. पीएमआरडीए क्षेत्रात सार्वजनिक वाहतूक उपयुक्त ठरली आहे. पुणे शहर, पिंपरी चिंचवड सोबत महानगरात समाविष्ट झालेली गावे आणि इतरही ग्रामीण भागातील गावांमध्ये पीएमपीएमएलची बससेवा पोहोचली आहे.

महानगरातील वाहतूक कोंडी ही येत्या काळातील मोठी समस्या होणार आहे. त्यामुळे वाहतूक व्यवस्था सक्षम आणि सुविधाजनक करणे हा त्यावरचा प्रभावी उपाय ठरू शकेल. त्यासाठी येत्या काळात ई-बससेवेचा विस्तार करण्यावर भर देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. राज्यातील विविध प्रकल्पांना शासन गती देत असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.