आर्थिक फसवणूक, जीवे मारण्याच्या धमकी प्रकरणी करुणा शर्मांविरोधात गुन्हा दाखल

तक्रारदाराविरोधात शर्मांकडूनही गुन्हा दाखल

130

करुणा शर्मा यांच्या विरोधात आर्थिक फसवणुकीसह जीवे मारण्याच्या धमकी दिल्याप्रकरणी संगमनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान तक्रारदाराविरोधात करुणा शर्मांच्या वतीने याआधीच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परस्पर विरोधी तक्रारी

मिळालेल्या माहितीनुसार, संगमनेर तालुक्यातील कोंची येथील फिर्यादी भारत भोसले यांनी करुणा शर्मा यांच्या विरोधात तक्रार केली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसले यांनी तक्रारीत म्हटले आहे की, नवा पक्ष काढण्यासाठी फिर्यादीकडून लाखो रुपये करुणा शर्मा यांनी घेतले असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तक्रारीत २२ लाख ४५ हजार रोख आणि १२ लाखांचे सोने घेतल्याचा दावा करण्यात आला आहे. उसनवारी म्हणून दिलेली रक्कम आणि सोने परत मागितल्याने जीवे मारण्याची धमकी करुणा शर्मा यांनी दिली असल्याचा आरोप करण्यात आला आहे. ७ जानेवारी ते २५ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत हे व्यवहार झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

(हेही वाचा – Ganeshotsav 2022: पाच दिवसांच्या बाप्पांचं विसर्जन, मुंबईसह राज्यात प्रशासनाची जय्यत तयारी)

शर्मांच्या तक्रारीवरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

दरम्यान करुणा शर्मा यांनी केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, संगमनेरमधील तिघांनी त्यांना एका कन्स्ट्रक्शन कंपनीत पैसे गुंतवल्यास तुम्हाला खूप फायदा होईल, असे सांगत त्यांच्याकडून ३० लाख रुपये घेतले. याचा कुठलाही परतावा न दिल्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला आहे. आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर शर्मा यांच्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, करुणा शर्मा-मुंडे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, संगमनेर शहरातील तिघांनी करुणा यांच्या सोबत असलेल्या ओळखीचा फायदा घेत त्यांचा विश्वास संपादन केला. आमची लेवलसेट कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी आहे. या कंपनीत तुम्ही पैसे गुंतवल्यास तुम्हाला खूप फायदा होईल. ३० लाख रुपये गुंतवल्यास कमीत कमी ४५ हजार रुपये किंवा जास्तीत जास्त ७० हजार रुपये दर महिना या प्रमाणे नफा देऊ. तसेच यापेक्षा जास्त फायदा झाल्यास त्या प्रमाणात तुम्हाला नफा देण्यात येईल. ठरल्याप्रमाणे त्यांनी जानेवारी २०२२ मध्ये रोख रक्कम आणि धनादेश स्वरूपात असे एकूण ३० लाख रुपये दिले. फेब्रुवारीमध्ये एकदाच मुंडे यांना ४५ हजार रुपये मिळाले. त्यानंतर त्यांनी संबंधितांकडे पैसे मागितले असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. खोट्या गुन्ह्यात फसविण्याची तसेच बदनामी करण्याची धमकी दिल्याचे करुणा शर्मा यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.