गांजा आणि एमडीचा तरुणांच्या भोवती विळखा

177

सुशांतसिंग राजपूत प्रकरणानंतर केंद्रीय अमली पदार्थ नियंत्रण ब्युरो (एनसीबी)ने मुंबईसह राज्यभरात छापे टाकून ड्रग्ज माफियांसह बॉलिवूडमध्ये ड्रग्जचा पुरवठा करणारे, ड्रग्जचे सेवन करणाऱ्यांवरील कारवाईत कोट्यवधींचे वेगवेगळ्या प्रकारचे ड्रग्ज जप्त केले होते. मागील काही महिन्यांत मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकानेदेखील मुंबईसह राज्यभरात तसेच राज्याच्या बाहेरून हजारो किलो ड्रग्ज जप्त केले. त्याच बरोबर अनेक ड्रग्ज (अमली पदार्थ) तयार करणारी रॅकेट उद्ध्वस्त करण्यात आली आहेत.

गांजा आणि एमडीची विक्री अधिक

भारतात सध्या गांजा आणि मफेड्रोन (एमडी) या ड्रग्जची मोठ्या प्रमाणात मागणी आहे. या दोन ड्रग्जने मुंबईसह संपूर्ण देशभरात धुमाकूळ उडवून दिला आहे. बॉलिवूड, रेव्ह पार्ट्या, डिस्को पब इत्यादी ठिकाणी मफेड्रोन मोठ्या प्रमाणात वापरले जात आहेत. एकेकाळी पार्टी ड्रग्जमध्ये एलएसडी डॉट पेपर, हेरॉईन, कोकेन, हशिस आणि ब्राऊन शुगर इत्यादी ड्रग्जचा समावेश होता. या पार्टी ड्रग्जला ‘एमडी’ आणि ‘अफगाणी गांजा’ने मागे टाकले असून पार्ट्यांमध्ये दोन ड्रग्जने आपली जागा पटकावली आहे. एमडी हा भारतात तयार होणारा ड्रग्ज असून तो तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल सहज उपलब्ध होत असल्यामुळे आणि तो ड्रग्ज स्वस्त असल्यामुळे या एमडीला मोठी मागणी आहे. तसेच गांजाची शेती होत असल्यामुळे त्यात कुठल्याही केमिकलचा वापर होत नसल्यामुळे व हे दोन्ही ड्रग्ज इतर महागड्या ड्रग्जप्रमाणेच नशा देत असल्यामुळे या दोन ड्रग्जची मागणी भारतातच नाही, तर परदेशात देखील होत असल्याची माहिती मुंबई अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी ‘हिंदुस्थान पोस्ट’सोबत बोलतांना दिली.

(हेही वाचा दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ, शिवतीर्थावर दसरा मेळाव्याचा मान कोणाला?)

कोणत्या माध्यमातून होते तस्करी?

मुंबईत अफगाणी गांजाला मोठी मागणी असून या अफगाणी गांजाची भारतात बेकायदेशीर शेती केली जाते. मुंबईत गांजाची तस्करी करण्यासाठी ड्रग्ज माफियाकडून विविध क्लुप्त्या लढवल्या जातात. कधी साधे गवत म्हणून हे आणले जाते, तर कधी चोरट्या मार्गाने गांजाची तस्करी केली जात आहे, तर एमडी व इतर ड्रग्ज आणण्यासाठी महिला तसेच विशिष्ट प्रकारच्या वाहनांचा वापर केला जात आहे, कुरियर कंपनीमार्फत देखील हे ड्रग्ज मोठ्या प्रमाणात मुंबईत आणले जातात. रस्ते, विमानतळ, तसेच मुंबईतील बंदरात जहाजातून हे ड्रग्ज आणले जात असल्याची माहिती पोलीस उपायुक्त नलावडे यांनी दिली. हा ड्रग्ज मुंबईत आल्यानंतर अनेक दिवस हे पार्सल मुंबईतील बंदरातून सोडवले जात नाही. काही आठवडे, महिने उलटल्यानंतर पकडल्या जाण्याची भीती नसल्याचे बघून हे ड्रग्ज विशिष्ट प्रकारच्या वाहनातून पुरवठा दारापर्यंत पोहचवले जातात. तेथून हे ड्रग्ज किरकोळ विक्रेत्यापर्यंत पोहचवले जाते. या ड्रग्जचे ग्राहक बॉलिवूड, उच्चभ्रूच्या पार्ट्या तसेच डिस्को पबमध्ये आहेत. महाविद्यालय, झोपड्यांमध्ये या ड्रग्जचे किरकोळ ग्राहक असले तरी या ठिकाणी त्यांची मागणी मोठी असल्याची माहिती सूत्रांनी दिली. आम्ही महाविद्यालयांमध्ये ड्रग्ज विरोधी मोहीम राबवून त्याच्या दुष्परिणामांची माहिती विद्यार्थ्यांना देत असतो, ड्रग्जमुळे होणाऱ्या हानीबाबत जनजागृती केली जात असल्याची माहिती नलावडे यांनी दिली.

महाराष्ट्रात एमडीचे कारखाने

ड्रग्जच्या आंतरराष्ट्रीय टोळ्या मोठ्या प्रमाणात असून आफ्रिकन, नायजेरियन टोळ्या, ड्रग्ज तस्करीमध्ये मोठ्या प्रमाणात आहेत. ड्रग्ज भारतात आणण्यासाठी तसेच भारतातून बाहेर घेऊन जाण्यासाठी आफ्रिकन महिलांचा वापर केला जातो, ड्रग्जचे कॅप्सूल तयार करून शरीरात अथवा अंतरवस्त्रात हे ड्रग्ज लपवून आणले जाते, कुरिअर कंपन्यांचा वापर देखील ड्रग्ज तस्करीसाठी केला जात असल्याचे पोलीस उपायुक्त नलावडे यांनी सांगितले. राज्यात तसेच परराज्यात एमडी या ड्रग्जचे मोठे कारखाने आहेत. ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ, पालघर जिल्हा, कोल्हापूर, पुणे, रायगड तसेच दिव दमन, गुजरात या राज्यांत एमडीचे कारखाने असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात एमडी तयार करून देशभरात त्याचा पुरवठा केला जात आहे. अमली पदार्थ विरोधी पथकाने गेल्या काही महिन्यात अंबरनाथ, पालघर, गुजरात, दमन या ठिकाणी असलेले एमडीचे कारखाने उद्ध्वस्त केले आहेत. येथून अमली पदार्थ विरोधी पथकाने हजारो किलो एमडी जप्त केले. या एमडीची आंतरराष्ट्रीय बाजारात हजारो कोटींची किंमत आहे.

(हेही वाचा अवघ्या १०-१५ दिवसांत खेतवाडीतील १५-२० फुटांच्या गणेशमूर्ती कशा उभ्या केल्या?)

किती कारवाया केल्या?

एकट्या अमली पदार्थ विरोधी पथकाने मागील ८ महिन्यांत १६५ गुन्हे दाखल करून १ हजार ९१३ किलो ४०८ ग्रॅम ड्रग्ज जप्त केले आहे. ज्यामध्ये गांजा ६७३ किलो, एमडी १ हजार २२८ किलो जप्त केला असून इतर ड्रग्जपेक्षा गांजा आणि एमडीवरील कारवाई मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. संपूर्ण मुंबईत गुन्हे शाखा, अमली पदार्थ विरोधी पथक आणि स्थानिक पोलीस पातळीवर मागील आठ महिन्यांत ५४६ गुन्हे दाखल करण्यात आले असून २ हजार ७३२ किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.