अफू, गांजा, चरस हा दहशतवादाचा फार मोठा प्रकार आहे. आपल्या दोन बाजूंच्या सीमांवरून हे अमली पदार्थ मोठ्या प्रमाणात देशात येत आहेत. अफगाणिस्तान आणि पाकिस्तान येथे याचे मोठे केंद्र आहे. पश्चिमेकडील भारत-पाकिस्तान सीमा राजस्थान आणि पंजाबला लागलेली आहे. त्या भागातून मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ अफगाणिस्तान आणि पाकिस्तानातून भारतात पाठवले जातात. पूर्वी स्मगलर, तस्कर हे अमली पदार्थ घेऊन यायचे, आता तेथील सीमेवर कुंपण लावल्यामुळे या मार्गाने अमली पदार्थ आणणे शक्य होत नाही. म्हणून आता ते ड्रोनचा वापर करू लागले आहेत, जे विना पायलट विमान असते. मागील वर्षभरात ५०-६० ड्रोन आपण पकडले आहेत, जे अमली पदार्थ घेऊन येत होते.
पंजाबला पोखरून काढले
भारत-पाकिस्तान सीमांचे रक्षण सीमा सुरक्षा दल करत असते, ही सीमा जम्मूपासून सुरु होते. जम्मूचा खालचा भाग, त्यानंतर पंजाब, राजस्थान, गुजरात या राज्यांच्या सीमा पाकिस्तानला लागलेल्या आहेत, त्याला आपण आंतरराष्ट्रीय सीमा म्हणतो. तेथून हे अमली पदार्थ येत असतात. पंजाबमधील ५० टक्के युवक अमली पदार्थांच्या आहारी गेले असावेत, जे खलिस्तानी दहशतवादाला शक्य झाले नव्हते, ते अफू, गांजा, चरसची तस्करी करणाऱ्या दहशतवादाने पंजाबला पोखरून काढले आहे. आता ते इतर राज्यांमध्ये पसरत आहे.
(हेही वाचा दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ, शिवतीर्थावर दसरा मेळाव्याचा मान कोणाला?)
उच्चभ्रू वर्ग अधिक प्रमाणात भरडला गेला
अमली पदार्थांची तस्करी होणारा दुसरा मार्ग हा समुद्रमार्ग आहे. त्या मार्गातूनही मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांची तस्करी होत आहे. गेल्या वर्षभरात हजारो कोटींचे अमली पदार्थ आपण समुद्रात पकडले आहेत. आपण जेवढे अमली पदार्थ पकडतो, त्याच्या तुलनेत किती तरी पटीने अमली पदार्थ भारतात येत असतील. त्यामुळे पंजाबसह मुंबई, दिल्ली, पुणे अशा शहरांमध्ये तरुण या अमली पदार्थाच्या आहारी जात आहेत, नुकतेच गोव्यात सोनाली फोगाट टिक टॉक स्टारचा मृत्यू झाला, तेव्हा तिनेही अमली पदार्थांचे सेवन केले होते, असे उघड झाले आहे. अशा प्रकारे भारतातील तरुणाई या ड्रग्जच्या विळख्यात सापडली आहे. यात उच्चभ्रू वर्ग अधिक प्रमाणात भरडला गेला आहे. त्यांना अतिशय सहजपणे हे ड्रग्ज मिळत असतात. इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रग्ज भारतातील विविध शहरांमध्ये येतात आणि ते पोलीस पकडू शकत नाहीत, हे नक्कीच आपले मोठे अपयश आहे. त्याची किंमत तरुणाईला मोजावी लागत आहे. दुसरे म्हणजे म्यानमारमधून मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ येतात, म्यानमारच्या सीमेला भारताच्या मिझोराम, मणिपूर या राज्यांची सीमा लागलेली आहे, तेथून हे अमली पदार्थ भारतात येत असतात आणि तिथूनही ते भारतातील इतर राज्यांमध्ये पोहचवले जातात. त्यामुळे या भागातील सीमांचेही रक्षण करणे अतिशय महत्वाचे आहे.
गुन्हेगारांना फाशी द्या..!
या भागातील अमली पदार्थांची तस्करी थांबवण्याचा प्रयत्न होत आहे, पण त्याला शंभर टक्के यश मिळाले नाही. म्हणून सीमा सुरक्षा दल आणि आसाम रायफल अधिक मजबूत झाले पाहिजे. भारतात बेकायदेशीर राहत असलेले बांगलादेशी, रोहिंग्या हे लोक परदेशातून आलेले अमली पदार्थ इतरत्र राज्यांत पोहचवण्याचे काम करत असतात. दुसरे म्हणजे इतर राज्यांमध्ये जे अमली पदार्थ पोहचवले जातात, तेथील राज्यांतील पोलीस अधिक सक्रिय होऊन त्यांनी हे अमली पदार्थ पकडले पाहिजेत. तसेच जे ड्रग्ज आणण्याचे आणि इतरत्र पोहचवण्याचे काम करतात त्यांना फाशी सारखी शिक्षा दिली पाहिजे. ज्यामुळे त्यांची पुढे असे काही करण्याची हिमंतच होणार नाही. त्याच बरोबर तरुण पिढीचे उद्धबोधन करत राहिले पाहिजे. त्यांना सांगितले पाहिजे की, जेव्हा ते ड्रग्जचे सेवन करायला सुरुवात करतात, तेव्हा त्यांचे नुकसान होत असते, त्यामुळे ते स्वतः आणि त्यांचे कुटुंब उद्ध्वस्त होते . एकदा का व्यक्ती ड्रग्जच्या आहारी गेली तर त्यातून तिला बाहेर काढणे सहजासहजी शक्य होत नसते. त्यामुळे तरुण पिढीमध्ये जागृती निर्माण केलीच पाहिजे. त्याचबरोबर व्यसनमुक्तीचे केंद्रे अधिक प्रमाणात वाढवली पाहिजेत. त्यातून तरुणांना नशामुक्त करण्यासाठी साहाय्य केले पाहिजे. या सगळ्यातही सामान्य माणसांची भूमिका महत्त्वाची आहे. जर आपल्या भोवती कोणी ड्रग्ज विकताना दिसला, किंवा सेवन करताना दिसला तर आपण पोलिसांचे कान आणि डोळे बनून ती माहिती तातडीने पोलिसांना सांगितली पाहिजे.
लेखक – ब्रिगेडियर हेमंत महाजन.
(हेही वाचा अवघ्या १०-१५ दिवसांत खेतवाडीतील १५-२० फुटांच्या गणेशमूर्ती कशा उभ्या केल्या?)
Join Our WhatsApp Community