गेल्या काही काळापासून देशात अंमली पदार्थांचा व्यापार हा सातत्याने वाढत आहेत. अंमली पदार्थांच्या सेवनाचे प्रमाण तरुण पिढीत मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. हा एकप्रकारे दहशतवादच असून त्याला नार्को टेररिझम म्हटले जाते. नार्को टेररिझम हा मोठा चिंतेचा आणि गंभीर विषय आहे. अंमली पदार्थांच्या या विळख्याने इतके गंभीर स्वरूप धारण केले आहे की ते आता नेहमीच्या ज्ञात दहशतवादापेक्षाही अधिक धोकादायक बनले आहे. ईशान्य भारतातील दहशतवादाचा विचार करता तेथील दहशतवादी कारवायांमध्ये मरण पावलेल्यांपेक्षा अधिक मृत्यू या नार्को टेररिझमने झाले आहेत. भारत हा देश केवळ अंमली पदार्थांना अन्यत्र पोहोचवण्यासाठी असलेले मध्यवर्ती ठिकाण वा ट्रान्झिशन राहिले नसून, येथील युवा पिढीही अंमली पदार्थांच्या विळख्यात सापडत आहे. हा चिंतेचा विषय आहे.
कमी किंमतीत अंमली पदार्थांची निर्मिती
नार्को टेररिझम, अंमली पदार्थांची तस्करी, वाहतूक, तसेच दहशतवाद यावर चर्चा झाली. यामुळे नार्को टेररिझमचे गांभीर्य अधोरेखित झाले आहे. या पदार्थांचे उत्पादन हे भारताच्या शेजारील शत्रू राष्ट्रे असलेल्या पाकिस्तान आणि अफगाणिस्तानात मोठ्या प्रमाणावर होत असते. तसेच इराणमध्येही मोठ्या प्रमाणावर या पदार्थांचे उत्पादन होत आहे. या देशांना गोल्डन ट्रँगल किंवा गोल्डन क्रिसेन्ट म्हटले जाते. या देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर बेकारी आहे. येथील नागरिकांना उत्पन्नाची कोणतीही साधने मोठ्या प्रमाणावर उपलब्ध नाही. कारण तिथे चांगल्या पायाभूत सुविधांचा आणि गुंतवणुकीचा अभाव आहे. गरिबीमुळे गोल्डन क्रिसेन्टमधील या देशांमध्ये अंमली पदार्थांची निर्मिती होत असते. या ठिकाणी अतिशय कमी गुंतवणुकीत अंमली पदार्थांची निर्मिती होते आणि त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी किंमत मिळते. यातच या अंमली पदार्थांच्या व्यवहाराचे सारे गणित समजून येते. हे अंमली पदार्थ कधी कुठून कोणत्या मार्गाने येतील याची कोणतीही ठोस माहिती देता येत नाही. दहशतवादी कारवायांचे मुख्य केंद्र असलेल्या पाकिस्तानातून मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ भारतात येत असतात. दररोज किलो किलोने हेरॉईन हे अंमली पदार्थ भारतात येते. ड्रोन, विमान मार्ग, रस्ते मार्गाने या पदार्थांची वाहतूक करण्यात येते. राष्ट्रीय स्तरावर नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो (NCB) कडून अमंली पदार्थांबाबत कारवाई करण्यात येते. तसेच स्थानिक पोलिसांकडून देखील याबाबत अनेकदा कारवाई करण्यात येत असते. या प्रकारच्या कारवायांना कुठल्याही हद्दींचे बंधन नसते. एनसीबीकडे असलेल्या माहितीचा स्त्रोत हा अधिक प्रभावी असतो, त्यामुळे बऱ्याचदा एनसीबीकडून कारवाई करण्यात येते. तसेच स्थानिक पोलिसांचीही एनसीबीकडून मदत घेण्यात येते.
(हेही वाचा अवघ्या १०-१५ दिवसांत खेतवाडीतील १५-२० फुटांच्या गणेशमूर्ती कशा उभ्या केल्या?)
भारताची युवा पिढी बनतेय व्यसनाधीन
केवळ श्रीमंतच नाही तर समाजातील सर्वच स्तरांतील लोक या अंमली पदार्थांच्या नशेला बळी पडत आहेत. भारत या साऱ्यामध्ये माल उतरून पुढे पाठवण्यासाठी असणारा भाग (ट्रान्झिशन) समजला जात असला, तरी देशातील मध्य प्रदेश, छत्तीसगड, आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये असणारी सुपीक जमीन या अंमली पदार्थांच्या लागवडीला उपयुक्त असून, तेथूनही महाराष्ट्रात या अंमली पदार्थांची तस्करी होत असते. रस्ते, रेल्वेमार्ग येथून गांजा महाराष्ट्रात येत असतो. महाराष्ट्र आणि देशात अंमली पदार्थ सेवन करण्याचे प्रमाण वाढले आहे, ही देखील चिंतेची बाब आहे. दहशतवादापेक्षाही अंमली पदार्थांचा विळखा घातक आहे. युवकांना तो हळूहळू नष्ट करतो. देशाच्या विविध भागांत आता अंमली पदार्थ पोहोचू लागले आहेत. अंमली पदार्थांचे हे विष अत्यंत धीम्या गतीने देशभरात पसरत आहे. असे जरी असले तरी वेळीच यावर अंकुश ठेवण्यात आला नाही तर भविष्यात हे विष झपाट्याने पसरेल.
Join Our WhatsApp Community