केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा रविवारी रात्री मुंबईत पोहचले. सोमवारी ते भाजपच्या प्रदेश कोअर कमिटीच्या बैठकीत तसेच मुंबईत पदाधिका-यांच्या बैठकीत मार्गदर्शन करणार आहेत. मुंबई महापालिकेवर कोणत्याही परिस्थितीत भाजपचा झेंडा फडवण्याचा कानमंत्र देतील, असे म्हटले जात आहे. दरम्यान, अमित शहा यांनी सहकुटुंब लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. त्यांच्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते.
अमित शहा यांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले तेव्हा त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. शिवाय मुंबई भाजपची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, ते आशिष शेलारही सोबत होते. या व्यतिरिक्त भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि विनोद तावडेदेखील उपस्थित होते.
( हेही वाचा: राऊतांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ, 19 सप्टेंबरपर्यंत वाढला मुक्काम )
हा आमच्यासाठी अभिमानास्पद क्षण- लालबाग राजा मंडळ
अमित शहा यांनी लालबागच्या राजाच्या दरबारात दर्शन घेतल्यानंतर, मंडळाने हा आमच्यासाठी अभिमानास्पद क्षण असल्याचे म्हटले आहे. ते दरवर्षी इथे येत असतात. लालबागच्या राजाचे अमित शहा निस्सिम भक्त आहेत, अशी प्रतिक्रिया लालबागच्या राजा मंडळाच्या पदाधिका-यांनी दिली. यावेळी अमित शहा यांनी लालबागच्या राजाच्या कार्यकर्त्यांशी, पदाधिका-यांशीही संवाद साधला. भाजपचे मनोज कोटक हे देखील यावेळी हजर होते.