मुंबईतील गणरायांचे दर्शन घेतल्यानंतर अमित शाह यांनी मुंबईत भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी अमित शहा यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. तुम्हाला माहिती आहे, उद्धव ठाकरेंनी आपल्याला दगा दिला. शिवसेनेने पाठीत खंजीर खुपसले. त्यामुळे उद्धव ठाकरेंना जमीन दाखवा, अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी टीका करत भाजपाच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना कार्यक्रम दिला.
२ जागांसाठी युती तोडली
भाजपने कधीच छोटा भाऊ-मोठा भाऊ म्हटले नाही. राजकारणात काहीही करा, पण धोका सहन करु नका. जे दगा देतात त्यांना योग्य शिक्षा झालीच पाहिजे. प्रत्येक कार्यकर्ता मैदानात उतरला पाहिजे. तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावावर, नेते देवेंद्र फडणवीसांच्या कामावर मते मागितली आणि जिंकून आले. त्यानंतर तुम्ही जनतेचा विश्वासघात केला, असे सांगत उद्धव ठाकरेंनी केवळ दोन जागांसाठी २०१४ मध्ये आपल्यासोबतची युती तोडली, असा गौप्यस्फोटही अमित शहा यांनी केला. उद्धव ठाकरे हे तेव्हा खयाली पुलाव पकवत होते. त्यांना वाटलेले भाजपा युती तोडणार नाही. आपल्याशिवाय भाजपाचे काय होणार, आपल्याच जास्त जागा जिंकून येतील, असा त्यांचा समज होता. जो चुकीचा ठरला, असे अमित शहा यांनी सांगितले. स्वत:च्या चुकीमुळेच शिवसेना फुटली, स्वत:च्या निर्णयामुळे शिवसेना छोटा पक्ष झाला, असेही अमित शहा म्हणाले.