अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या ‘हिंदुस्थान पोस्ट’ या डिजिटल माध्यमाच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन सोमवारी, ५ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. सध्याच्या डिजिटल युगात ‘हिंदुस्थान पोस्ट’ने नव्या जोमाने काम करावे आणि प्रभावीपणे जनहिताचे प्रश्न तडीस लावावेत, अशा शब्दांत मुख्यमंत्री शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी मुख्यमंत्री शिंदे यांनी ‘हिंदुस्थान पोस्ट’च्या अत्याधुनिक स्टुडिओलाही भेट दिली. यावेळी ‘हिंदुस्थान पोस्ट’चे संपादक आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे सहकार्यवाह स्वप्नील सावरकर, सावरकर स्मारकाचे कार्याध्यक्ष आणि ‘हिंदुस्थान पोस्ट’चे मुद्रक-प्रकाशक रणजित सावरकर, सावरकर स्मारकाच्या कोषाध्यक्ष आणि ‘हिंदुस्थान पोस्ट’च्या सल्लागार संपादिका मंजिरी मराठे, शिवसेना खासदार राहुल शेवाळे, भाजपा नेते अवधूत वाघ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
(हेही वाचा अमित शहांच्या टीकेमुळे शिवसेनेचा तिळपापड)
विकासकामांच्या नावाखाली गप्पा मारणे पटत नाही
कार्यालयाच्या उद्घाटनानंतर ‘हिंदुस्थान पोस्ट’शी संवाद साधताना मुख्यमंत्री म्हणाले, हे जनतेचे सरकार आहे. केवळ निवडणुकांपुरत्या विकासकामांच्या गप्पा मारणे आमच्या तत्त्वात बसत नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मी शिवसेना-भाजप युती एकत्र काम करीत आहोत. आम्हाला मुंबईला खूप पुढे घेऊन जायचे आहे. सध्या आम्ही मुंबईला खड्डेमुक्त करण्याचा संकल्प केला आहे. त्यानुषंगाने जवळपास ६५० किलोमीटर रस्त्यांची निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. लवकरच ४८० किमी रस्त्यांची निविदा प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
Join Our WhatsApp Community