पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी पंचमहाभूते फाउंडेशनद्वारे ‘पर्यावरण विघ्नहर्ता 2022’ स्पर्धेचं आयोजन, बक्षिसेही आहेत हटके

252

दरवर्षी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी राज्यात विविध उपक्रम हाती घेण्यात येतात. यामध्ये अनेक एनजीओ सुद्धा मोठं कार्य करत असतात. पंचमहाभूते फाउंडेशन या एनजीओतर्फे यंदाच्या वर्षी एक आगळा वेगळा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

या संस्थेद्वारे ‘पर्यावरण विघ्नहर्ता 2022’ राज्यस्तरीय पर्यावरणस्नेही (Eco Friendly) गणेश मूर्ती आणि सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पर्यावरणपूरक सजावट करणारी सार्वजनिक गणेश मंडळे तसेच घरगुती सजावट करणा-या गणेशभक्तांचा या स्पेर्धेतून सन्मान करण्यात येणार आहे.

पर्यावरणपूरक गणेशोत्सव

‘पृथ्वी सर्वप्रथम’ असे ब्रीदवाक्य असलेल्या पंचमहाभूते फाउंडेशनद्वारे 2021 पासून पर्यावरण विघ्नहर्ता या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यंदाच्या वर्षी देखील या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, घरगुती तसेच सार्वजनिक गणेश मंडळांना याद्वारे पारितोषिक देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या स्पर्धेचे अनावरण करण्यात आले आहे. या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे विजेत्या गणेशभक्तांना बक्षिसाच्या स्वरुपात वृक्षांची रोपं आणि सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक सहभागी स्पर्धकाला ई-प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी सर्व गणेशभक्तांना विनामूल्य प्रवेश देण्यात आला आहे.

New Project 91

असे व्हा सहभागी

या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपल्या Eco-Friendly गणपती बाप्पाची आणि बाप्पाच्या सजावटीची छायाचित्रे आणि व्हिडिओ पंचमहाभूते(@panchamahabhute) या फेसबूक पेजवर शेअर करायची आहेत. 31 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर 2022 या कालावधीत आपल्याकडील छायाचित्रे या फेसबूक पेजवर शेअर करायची आहेत. या स्पर्धेतील विजेत्यांची नावे रविवार 19 सप्टेंबर 2022 रोजी याच फेसबूक पेजवर जाहीर करण्यात येणार आहेत. विजेत्यांना वृक्षांची रोपं आणि सन्मानचिन्ह घरपोच पाठवण्यात येणार आहेत.

त्यामुळे पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी या स्पर्धेत जास्तीत जास्त गणेश भक्तांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन पंचमहाभूते फाउंडेशनच्या वतीने करण्यात येत आहे. पंचमहाभूते फाउंडेशनने स्थापनेपासून अवघ्या दीड वर्षांच्या काळात पर्यावरण रक्षणासाठी मोठे कार्य केले असून चांगला नावलौकीक मिळवला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.