सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीच्या आठवड्यात मुंबईत डेंग्यूचे रुग्ण वाढल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. मुंबईत ४ सप्टेंबरपर्यंतच्या पावसाळी आजारांच्या आकडेवारीत डेंग्यूचे २९ रुग्ण आढळले आहेत. याबाबत मुंबईकरांनी खबरदारी बाळगण्याचे आवाहन मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने केले. लेप्टोच ६ तर स्वाईन फ्लूच्या ३ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.
पालिकेने २८ ऑगस्टनंतर मुंबईतील पावसाळी आजारांची माहिती जाहीर करताना केवळ सहा दिवसांत डेंग्यूच्या वाढत्या रुग्णसंख्येबाबत पालिका आरोग्य विभागाने चिंता व्यक्त केली आहे. मुंबईत सर्वात जास्त रुग्ण मलेरियाचे आढळत आहे. यंदाच्या पावसाळी आजारांच्या माहितीत गेल्या सहा दिवसांत तब्बल ८९ रुग्णांना मलेरियाची बाधा झाल्याचे उघडकीस आले. ही रुग्णसंख्या इतर सर्व आजारांच्या तुलनेत जास्त दिसून आली. त्याखालोखाल गॅस्ट्रोच्या ३८ रुग्णांची नोंद झाली. हेपेटायटीसचे ४ तर चिकनगुनियाचा एक नवा रुग्ण सापडल्याची माहितीही पालिका आरोग्य विभागाने दिली.
डेंग्यू टाळण्यासाठी
- अंग झाकलेले पूर्ण कपडे घाला.
- डेंग्यूची बाधा देणारा एडिस मोस्किटो डास दिवसा चावतो. हा डास साचलेल्या पाण्यात अंडी घालतो. त्यामुळे साचलेले पाणी तातडीने स्वच्छ करा. नारळाची करवंटी, टायर यामध्ये साचलेल्या पाण्याचा तातडीने निचरा करा.
- ताप, डोकेदुखी, अंगावर चट्टे, स्नायू किंवा सांधेदुखी, उलट्या, जुलाब या लक्षणांकडे कानाडोळा नको.
- लक्षणे आढळल्यास पालिका दवाखाने किंवा रुग्णालयाला भेट देत आवश्यक चाचण्या करुन घ्या. डेंग्यूवर वेळेवर उपचार होणे गरजेचे आहे. अन्यथा मृत्यूही ओढावू शकतो.
( हेही वाचा: शिवसेना कुणाची ठरवण्यासाठी लवकर निर्णय घ्या! शिंदे गटाची सर्वोच्च न्यायालयात याचिका )
स्वाईन फ्लू टाळण्यासाठी…
- शिंकताना नाकावर रुमाल किंवा टिश्यू पेपर घ्या.
- नाक, डोळे किंवा तोंडाजवळ हाताने स्पर्श करु नका.
- गर्दीची ठिकाणे टाळा.
- सतत ताप येत असेल, श्वसनाला त्रास होत असल्यास किंवा त्वचा किंवा ओठ निळे झाल्यास तातडीने रुग्णालय गाठा.
- या लक्षणांकडे कानाडोळा करु नका, वेळेवर उपचार न मिळाल्यास रुग्ण दगावण्याची भीती आहे.