राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिवसेना नेमकी कोणाची याबाबतचा वाद आता सर्वोच्च न्यायालयात दाखल आहे. या प्रकरणात घटनात्मक बाबींचा समावेश असल्यामुळे याबाबत एक स्वतंत्र घटनापीठ स्थापन करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला आहे. बुधवारी याबाबत घटनापीठ स्थापन होणार असल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाचा जोपर्यंत निर्णय येत नाही तोपर्यंत निवडणूक आयोगाने पक्ष चिन्हाबाबत कुठलाही निर्णय घेऊ नये असे सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत. त्यानंतर आता याप्रकरणी निवडणूक आयोगाला प्रक्रिया सुरू करण्यासाठी आदेश द्यावेत, अशी मागणी शिंदे गटाकडून न्यायालयात करण्यात आली आहे. त्यामुळे आता याबाबत घटनापीठ स्थापन करण्यात येणार आहे.
(हेही वाचाः ‘वर्षा’वरील स्नेहभोजनाला शिंदे गटातील ‘हा’ आमदार राहणार गैरहजर, चर्चांना उधाण)
सरन्यायाधीशांचे आदेश
सर्वोच्च न्यायालयाचे नवनियुक्त सरन्यायाधीश उदय लळीत यांनी हे घटनापीठ तात्काळ तयार करण्याचे आदेश दिले आहेत. या घटनापीठात सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचा समावेश असणार आहे. हे घटनापीठ स्थापन झाल्यानंतर या प्रकरणाची सुनावणी नेमकी कधी होणार आणि शिवसेना पक्षाचा अधिकृत दर्जा कोणाला मिळणार हे पाहणे आता महत्वाचे असणार आहे.
शिंदे गटाची न्यायालयात याचिका
दरम्यान, आगामी महापालिका निवडणुका आणि अंधेरी पूर्वचे आमदार रमेश लटके यांचे निधन झाल्यामुळे त्याजागी पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे. त्यामुळे या निवडणुकांसाठी पक्षचिन्ह मिळणे महत्वाचे असल्याने हा वाद लवकरात लवकर निकाली लावणे हे शिंदे गट आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी महत्वाचे असणार आहे. त्यामुळेच केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सुनावणीला स्थगिती देऊ नये यासाठी शिंदे गटाकडून न्यायालयात धाव घेण्यात आली आहे.
Join Our WhatsApp Community