सायरस मिस्त्री यांच्या अपघाताचे नाट्यरुपांतर करुन केला जाणार तपास

146

टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा मृत्यू झाला. त्या अपघातग्रस्त वाहनाचे फॉरेन्सिक ऑडिट सुरु करण्यात आले आहे. यासाठी तज्ज्ञांची मदत घेतली जात आहे. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी हे ऑडीट केले जात असून लवकरच हा अपघात कोणाच्या चुकीमुळे झाला याचा उलगडा होईल असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर या अपघाताचे नाट्यरुपांतर करुन, फॉरेन्सिक क्रॅश तपास करण्यात येणार आहे.

पालघर जिल्ह्यातील डहाणू येथील चारोटी पुलाजवळ टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांच्या मर्सडिज बेन्ज या वाहनाला भीषण अपघात झाला. हे वाहन अनहिता पंडोले चालवत होत्या. गुजरातहून मुंबईकडे येताना हा भीषण अपघात झाला आणि या अपघातात सायरस मिस्त्री यांचा जागीच मृत्यू झाला. सायरस मिस्त्री हे या कारच्या मागे बसले होते. त्यांनी सीटबेल्ट बांधले नसल्यामुळे ते अपघातानंतर वाहनांच्या बाहेर फेकले गेल्याचे, प्राथमिक तपासात समोर आले आहे. हा अपघात नेमका कुणाच्या चुकीमुळे झाला किंवा वाहनात काही दोष होता का? याचा तपास करण्यासाठी तज्ज्ञांची मदत घेण्यात येणार आहे.

अपघाताचे नेमके कारण येणार समोर 

तज्ज्ञांकडून अपघातग्रस्त वाहनाचे फॉरेन्सिक ऑडिट करण्यात येणार असून, या वाहनाच्या प्रत्येक भागाची तपासणी करण्यात येणार आहे. त्याचसोबत घटनास्थळी अपघाताचे नाट्यरुपांतर (री-कन्स्ट्रक्शन) आणि फॉरेन्सिक क्रॅश तपास करण्यात येणार आहे. या सर्व तपासणीनंतर अपघाताचे नेमके कारण काय? कुणाच्या चुकीमुळे हा अपघात झाला याची माहिती समोर येईल असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

असा केला जाणार अभ्यास 

फॉरेन्सिक क्रॅश विश्लेषणाचा भाग म्हणून सविस्तर वाहन अभ्यास करण्यात येणार असून, वाहनाचे नुकसान पाहणे, सीट बेल्ट वापरले आहेत की नाही हे पाहण्यासाठी ब्रेक तपासणे इत्यादींचा समावेश असेल. वाहनाच्या सर्व कानाकोपऱ्यातून छायाचित्रे घेण्यात आलेली असून, ही छायाचित्रे तपासली जाणार आहेत. या तपासातील पुरावे आणि कारमध्ये  सापडलेले  पुरावे जुळतात का याची तपासणी करण्यात येणार आहे. एकदा विश्लेषण पूर्ण झाल्यानंतर, क्रॅश भागाची सॉफ्टवेअर वापरून पुनर्रचना केली जाते आणि क्रॅशची कारणे कोणती होती याचे सर्वात अचूक वर्णन केले जाणार आहे.

( हेही वाचा: शाळांप्रमाणेच महाविद्यालयातही राष्ट्रगीत सुरु होणार? )

अपघाताला कारणीभूत प्रमुख तीन मानवी घटक

रस्ता सुरक्षा नॉन-प्रॉफिट सेव्हलाइफ फाऊंडेशनच्या एका अभ्यासानुसार, भारतातील बहुतेक रस्ते अपघातांमध्ये ३३ अभियांत्रिकी घटक कारणीभूत आहेत. यापैकी काही रस्त्यांची खराब देखभाल, खराब पादचारी पायाभूत सुविधा, दृष्टी अडथळा, चिन्हांचा अभाव इत्यादी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या अभ्यासात वेग, अयोग्य पद्धतीने लेन बदलणे आणि महामार्गावरील वाहनांचे पार्किंग हे रस्ते अपघातांना प्रमुख तीन ‘मानवी’ घटक कारणीभूत असल्याचे म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.