बँकांच्या एटीएम मशीनमध्ये भरणा करण्यासाठी येणारी कोट्यवधी रुपयांची रोकड लुटून व्हॅन चालकाने पळ काढल्याची घटना गोरेगाव येथे घडली. याप्रकरणी गोरेगाव पोलिसांनी व्हॅन चालकांवर गुन्हा दाखल केला असून, त्याचा कसून शोध घेण्यात येत आहे.
विविध बँकांच्या एटीएममशीनमध्ये रोकड भरण्याचे कंत्राट अनेक बँकांनी सीएमएस या कंपनीला दिलेले आहे. दररोज सकाळी या कंपनीकडून विविध बँकांमध्ये रोकड भरली जाते. सोमवारी या कंपनीचा कर्मचारी प्रवीण मांचेकर हा गोरेगाव येथील बँकांच्या एटीएममध्ये रोकड भरण्यासाठी कंपनीच्या वाहनातून निघाला होता. त्याने काही एटीएममध्ये रोकड भरल्यानंतर गोरेगाव येथील एका बँकेच्या एटीएममध्ये रोकड भरण्यासाठी गेला होता. त्याच्यासोबत चालक उदयभान सिंग होता. प्रवीण हा पैसे भरण्यासाठी गेला असताना वाहन वळवून घेतो असे सांगून त्याने वाहनात असलेली २ कोटी ८० लाख ५० हजार रुपयांच्या रोकडसह पोबारा केला. या प्रकरणी प्रवीण मांचेकर याने गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. गोरेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करून वाहन चालकाचा शोध सुरू केला आहे.
Join Our WhatsApp Community