गणेशोत्सवाच्या अखेरीस अनंत चतुर्दशी दिनी मोठ्या संख्येने होणारे श्री गणेश मूर्ती विसर्जन लक्षात घेता मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे यांनी स्वराज्य भूमी (गिरगांव चौपाटी) सह वरळी, दादर, माहीम, शीव आदी ठिकाणी मंगळवारी भेटी देवून विसर्जन व्यवस्थेची पाहणी केली व प्रशासनाला योग्य ते निर्देश दिले.
( हेही वाचा : Mumbai Local : गणपती विसर्जनासाठी १० विशेष लोकल गाड्या; पहा संपूर्ण वेळापत्रक)
यंदाच्या श्री गणेशोत्सवातील दीड दिवस, पाच दिवसांसाठी प्रतिष्ठापना केलेल्या गणेश मूर्तींचे विसर्जन सुरळीतपणे पार पडले आहे. त्यासाठी मुंबई महानगरपालिकेने नैसर्गिक स्थळांवर चोख व्यवस्था राखली आहे. त्याचप्रमाणे ठिकठिकाणी कृत्रिम तलावेही तयार केली आहेत. गणेशोत्सवाच्या अखेरच्या टप्प्यात विशेषतः अनंत चतुर्दशी दिनी मोठ्या संख्येने गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात येत असल्याने अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) अश्विनी भिडे यांनी मंगळवारी प्रमुख स्थळांना भेटी देवून पाहणी केली आणि कार्यवाहीचा आढावा देखील घेतला.
प्रारंभी, स्वराज्यभूमी (गिरगांव चौपाटी) येथे अश्विनी भिडे यांनी पाहणी केली. शहर विभागातील बहुतांश सार्वजनिक मंडळांकडून याठिकाणी गणेशमूर्ती विसर्जन करण्यात येते. तसेच अनंत चतुर्दशी दिनी विविध मान्यवर, पाहुणे, राजदूत, निमंत्रित, विदेशी नागरिक देखील याठिकाणी विसर्जन सोहळा पाहण्यासाठी येतात. त्याअनुषंगाने स्वागत व्यवस्था, विसर्जन मार्ग व विसर्जनासाठी समुद्र किनारी केलेली व्यवस्था, पाहुण्यांसाठी उभारलेला शामियाना, निरनिराळे कक्ष, वाहनतळ नियोजन, स्वच्छता राखण्यासाठी केलेली उपाययोजना, सुरक्षा व्यवस्था यांची संपूर्ण माहिती अश्विनी भिडे यांनी जाणून घेतली. उपआयुक्त (परिमंडळ २) तथा श्री गणेशोत्सव समन्वयक रमाकांत बिरादार, उपआयुक्त चंदा जाधव, सहायक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी आवश्यक ती माहिती अतिरिक्त आयुक्तांना दिली.
अश्विनी भिडे यांनी त्यानंतर जी/दक्षिण विभागात वरळीतील लोटस जेट्टी येथे पाहणी केली. सहायक आयुक्त संतोष धोंडे व संबंधित अधिकारी याप्रसंगी उपस्थित होते. जी/उत्तर विभागातील दादर चौपाटी व माहीम रेतीबंदर चौपाटी येथेही अश्विनी भिडे यांनी भेट दिली. आतापर्यंत झालेले मूर्ती विसर्जन, अखेरच्या टप्प्यात अपेक्षित असलेले मूर्ती विसर्जन, कृत्रिम तलाव व नैसर्गिक स्थळांपैकी कोणत्या ठिकाणी जनतेचा कल अधिक आहे, वैद्यकीय यंत्रणा उपलब्ध आहे किंवा कसे, या सर्व बाबींची तपशिलवार माहितीही त्यांनी सहायक आयुक्त प्रशांत सपकाळे यांच्याकडून त्यांनी जाणून घेतली.
एफ/उत्तर विभागातील शीव (सायन) तलाव या नैसर्गिक स्थळी देखील अतिरिक्त आयुक्तांनी थेट तराफ्यावर जावून पाहणी केली आणि तलावात मूर्ती विसर्जन नेमके कसे केले जाते, याचा तपशिल जाणून घेतला. सहायक आयुक्त गजानन बेल्लाळे यावेळी उपस्थित होते.
Join Our WhatsApp Community