केंद्र सरकारच्या जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत विहित निकषापेक्षा जादा दरडोई खर्च असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या २ आणि जिल्हा परिषदेच्या २५३ अशा सुमारे ३१४ कोटी रुपयांच्या २५५ ग्रामीण पाणी पुरवठा योजनांच्या प्रस्तावांना मंगळवारी मान्यता देण्यात आली. पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
( हेही वाचा : राज्यातील २८१ कृषी उत्पन्न बाजार समित्यांची निवडणूक जाहीर, २९ जानेवारीला मतदान )
बैठकीला पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजीव जयस्वाल, महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा, जलजीवन मिशनचे अभियान संचालक ऋषिकेश यशोद, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे आयुक्त सी. डी. जोशी उपस्थित होते.
जल जीवन मिशन हा केंद्र शासनाचा महत्वाकांक्षी व कालबद्ध कार्यक्रम असून, त्यांतर्गत २०२४ पर्यंत देशातील सर्व ग्रामीण कुटुंबांना वैयक्तिक नळ जोडणीद्वारे दरडोई ५५ लिटर मानकाप्रमाणे शाश्वत व गुणवत्तापूर्ण पेयजल उपलब्ध करुन देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. शासनाच्या २९ जूनच्या शासन निर्णयानुसार ग्रामीण नळ पाणी पुरवठा योजनांसाठी दरडोई खर्चाचे सुधारीत निकष निश्चित करण्यात आले आहे.
Join Our WhatsApp Community