नागपुरातील शेफ विष्णू मनोहर यांनी बुधवारी 7 सप्टेंबर रोजी गणेशोत्सवाच्या निमित्ताने सकाळी 9 वाजता 2500 किलोचा सातळलेल्या डाळीचा महाप्रसाद तयार केला. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कढईत सराटा फिरवून महाप्रसाद तयार करण्यास सुरूवात करून दिली.
(हेही वाचा – ‘लव्ह जिहाद’वरुन नवनीत राणा आक्रमक! “मुलीचा शोध घ्या”, अमरावती पोलिसांना दिला अल्टिमेटम)
विशेष म्हणजे हा महाप्रसाद संपूर्णपणे पारंपरिक पद्धतीने तयार करण्यात आला. महाप्रसाद तयार करतांना वीजेवर चालणाऱ्या उपकरणांचा उपयोग केला जाणार नाही असे विष्णू मनोहर यांनी पूर्वीच सांगितले होते. अगदी धणे पावडरही धणे कुटून तयार केली होती. भाज्या चिरून, खोबरे किसून व मसाले कुटून ठेवण्यात आले होते. महाप्रसादासाठी लागणारी तयारी पूर्ण करूनच सुरूवात करण्यात आल्याचे मनोहर यांनी सांगितले. पारंपरिक पद्धतीने तयार केलेला महाप्रसाद देवाला पावतो तसेच स्वादिष्ट, रूचकर आणि पाचक होतो असे मनोहर यांनी सांगितले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. सोबतच हा महाप्रसाद बाप्पांच्या भक्तांना वितरित करण्यात आला.
भक्तीमय कार्यक्रमात विष्णू मनोहर यांच्या महाप्रसादाला प्रसिद्ध भजन गायक कमलेश पांडे यांच्या सुरेल स्वरांची साथ लाभली होती. या सोबतच ढोलताशांचा जल्लोषही होता. हा कार्यक्रम निःशुल्क होता. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रेडिओ पार्टनर माय एफएम, व्हेन्यू पार्टनर अमृत भवन, ट्रॅव्हल पार्टनर एमडी ट्रॅव्हल आणि विश्वा ट्रॅव्हल, फिल्म प्रोडक्शन आकार फिल्म्स यांनी पुढाकार घेतला होता.
असा तयार करण्यात आला महाप्रसाद
10X10 च्या लोखंडाच्या कढईत महाप्रसाद तयार करण्यात आला. या महाप्रसादासाठी चणाडाळ 700 किलो, शेंगदाणे 100 किलो, तेल 150 किलो, खोबऱ्याचे काप 50 किलो, सांभार व कडीपत्ता प्रत्येकी 100 किलो, लाकूड 500 किलो, काकडी 400 किलो लागणार आहे. या शिवाय गुळ, पीठ, धने, जीरे पावडर, हळद, तिखट, खड्या लाल मिर्च्या, हिंग चवीनुसार वापरण्यात आले.
Join Our WhatsApp Community