मध्यवर्ती कारागृहात नागपूर पोलिसांचे सर्च ऑपरेशन, जेलमध्ये सापडला गांजा; 8 जण अटकेत

173

नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी मध्यवर्ती कारागृहात धाड टाकली आहे. कारागृहात गांजा आणि मोबाईलच्या बॅटऱ्या पोहचवणारी टोळी असल्याची माहिती पुढे आली आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्च ऑपरेशनचा एक भाग म्हणून ही धाड टाकण्यात आली. कारागृह परिसरात सुमारे दीडशे ते दोनशे पोलिसांचा बंदोबस्तही लावण्यात आला होता.

(हेही वाचा – ‘लव्ह जिहाद’वरुन नवनीत राणा आक्रमक! “मुलीचा शोध घ्या”, अमरावती पोलिसांना दिला अल्टिमेटम)

नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून असे प्रकार अजिबात खपवून घेतले जाणार नाही, असे बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले. या प्रकरणात आतापर्यत 8 जणांना अटक करण्यात आली असून आरोपींची संख्या वाढू शकते, असे पोलीस आयुक्तांनी सांगितले. बुधवारी घेण्यात आलेल्या झडतीत कारागृहातून सुमारे 15 मोबाईल बॅटरी जप्त करण्यात आल्या आहे. या टोळीचा सूत्रधार अत्याचाराच्या आरोपात तुरूंगात सजा भोगत असलेला पोलीस उपनिरीक्षक असल्याची माहिती तपासात उघड झाली आहे.

या प्रकरणात मोक्का प्रकरणातील आरोपी सूरज कन्हय्यालाल कावळे (वय 22, खापरखेडा) याच्यासह 8 जणांना अटक करण्यात आली असून, कारागृहातील बंदीवान उपनिरीक्षकही पोलिसांच्या रडारवर आला आहे. अटकेतील आरोपींमध्ये सूरजचा भाऊ शूभम कावळे, त्याचा मित्र सूरज वाघमारे, अमली पदार्थ तस्कर मोरेश्वर सोनवणे, मुकेश बाबू पंजाबराव नायडू, भागीरथ थारदयाल व कुख्यात शेखू टोळीचा सदस्य अर्थव खटाखटी यांचा समावेश आहे. कारागृहात गांजा व मोबाइल बॅटऱ्या पोहोचविण्याच्या टोळीचा सखोल तपास करण्यात येत आहे. याप्रकरणाचा तपास गुन्हेशाखा पोलीस व अमली पदार्थ विरोधी पथकाकडे सोपविण्यात आला आहे. गांजाचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर सोमवारी गुन्हे शाखा पोलिसांनी गांजा व मोबाईलच्या बॅटऱ्या कुठून घेण्यात आल्या याची माहिती गोळा केली. त्यानंतर मंगळवारी सहा जणांना अटक करण्यात आली. तर बुधवारी कारागृहात शोधमोहीम घेत झडती घेण्यात आली.

गेल्या तीन वर्षांपासून मोक्का प्रकरणात सूरज व त्याचे साथीदार कारागृहात आहेत. जुलै महिन्यात 17 वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणात सीताबर्डी पोलिसांनी नक्षलविरोधी अभियानात कार्यरत उपनिरीक्षक प्रदीपकुमार श्रीकृष्ण नितवने याला अटक केली होती. न्यायालयीन कोठडीअंतर्गत प्रदीपकुमार हा कारागृहात आहे. याप्रकरणात त्याला निलंबितही करण्यात आले. प्रदीपकुमार व सूरज एकाच बराकीत राहात असल्यामुळे दोघांची ओळख आहे. प्रदीपकुमारने सूरजच्या मदतीने कारागृहात मोबाईल बॅटऱ्या व गांजा आणायला सुरुवात केली.

सुरुवातीला वेगवेगळ्या आयडीया लढवून काही मोबाईल कारागृहात पोहोचविण्यात आले. मात्र त्यासाठी लागणाऱ्या बॅटऱ्या नव्हत्या. प्रदीपकुमारने कारागृहातूनच मोबाईलद्वारे एका मित्राशी संपर्क साधून शुभम याला 45 हजार रुपये द्यायला लावले. प्रदीपच्या मित्राने शुभमला पैसे दिले. त्यानंतर शुभम याने साथीदारांच्या मदतीने मोबाइलच्या 15 बॅटऱ्या व गांजाची खरेदी केली. सोमवार 5 सप्टेंबर रोजी न्यायालय परिसरात शुभम व भागीरथ या दोघांनी आरोपपत्र असलेल्या फाइलमध्ये 51 ग्राम गांजा व 15 मोबाइलच्या बॅटऱ्या ठेऊन त्या सूरजला दिल्या.

कारागृहात जाण्यासाठी तपासणीदरम्यान सुरक्षा रक्षकांना गांजा व मोबाईलच्या बॅटऱ्या आढळल्या. याप्रकरणी धंतोली पोलिसांनी कट रचणे, अमली पदार्थ बागळण्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. मंगळवारी प्रोडक्शन वॉरंट घेऊन सूरजला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याची 10 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली. त्यानंतर अन्य 6 जणांनाही अटक करण्यात आली आहे. सूरजला न्यायालयात अमली पदार्थ व मोबाईलच्या बॅटऱ्या देण्यात आल्या. याप्रकरणात निष्काळजीपणा केल्याचे समोर आल्याने पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी तडकाफडकी आरोपी सेलचे हेडकॉन्स्टेबल प्रकाश मुसळे व शिपाई हेमराज राऊत यांना निलंबित केले. याप्रकरणात अन्य कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे किंवा नाही याचीही चौकशी करण्यात येत असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.