विविध देशांच्या महावाणिज्य दूतांनी घेतले मुंबईतील मानाच्या गणपतींचे दर्शन

128

विविध देशांतील महावाणिज्य दूतांना मुंबईतील मानाच्या गणरायांचे दर्शन घडविण्यात येत आहे. त्यांच्या माध्यमातून परदेशात प्रचार-प्रसार होऊन लाखो भाविक, पर्यटक गणेशोत्सवासाठी महाराष्ट्रात येतील आणि नजिकच्या काळात हा उत्सव जगातील महाउत्सव बनेल, असा विश्वास पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी बुधवारी व्यक्त केला.

गणेशोत्सवाची जगभरात ओळख व्हावी यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. याचाच एक भाग म्हणून पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्यावतीने विविध देशांच्या मुंबई स्थित महावाणिज्य दूतांना मानाच्या पाच गणपतींचे दर्शन घडविण्यात येत आहे. बुधवारी दुसऱ्या टप्प्यात मंत्री लोढा यांनी वडाळा येथील जीएसबी गणेश मंडळाजवळ १५ देशांतील महावाणिज्य दूतांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करून त्यांना गणेशोत्सवाच्या वैभवशाली परंपरेची ओळख करून दिली. यावेळी एमटीडीसीच्या व्यवस्थापकीय संचालक जयश्री भोज, महाव्यवस्थापक चंद्रशेखर जैस्वाल उपस्थित होते.

महाराष्ट्रात पर्यटनाचा खजिना – लोढा

लोढा म्हणाले, महाराष्ट्रात पर्यटनाचा खजिना आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यटन विभागामार्फत देशातील पर्यटकांबरोबरच विदेशी पर्यटक राज्यात यावेत यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. ‘उत्सव पर्यटन’ हा त्याचा एक भाग असून भविष्यात सर्व प्रकारच्या पर्यटनाला चालना मिळावी यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत.

या गणपतींचे घेतले दर्शन

पहिल्या टप्प्यात दहा देशांतील महावाणिज्य दूतांना गणरायांचे दर्शन घडविण्यात आले होते. बुधवारी दुसऱ्या टप्प्यात १५ देशांतील महावाणिज्य दूतांनी वडाळा येथील जीएसबी गणेश मंडळ, लालबाग येथील गणेश गल्ली आणि लालबागचा राजा, गिरगाव येथील मोहन बिल्डिंग तसेच लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या सर्वात जुन्या केशवजी नाईक चाळ येथील गणेशांचे दर्शन घेतले.

(हेही वाच – मध्यवर्ती कारागृहात नागपूर पोलिसांचे सर्च ऑपरेशन, जेलमध्ये सापडला गांजा; 8 जण अटकेत)

१५ देशांचे दूत सहभागी

या उपक्रमात सहभागी झालेल्या महावाणिज्य दूतांमध्ये जपानचे याशुकाता फुकाहोरी, स्वीडनच्या ॲना लेकवाल, आयर्लंडच्या अनिता केल्ली, इंडोनेशियाचे अगुस सापतोनो, दक्षिण आफ्रिकेच्या अँड्रिया कुन, फ्रान्सचे जीन मार्क सेरे चार्लेट, नेदरलँडचे बार्ट दे जोंग, थायलंडचे दोन्नावित पूलसावत, जर्मनीचे अचिम फॅबिग, अफगाणिस्तानच्या झाईका वार्डक, न्युझिलंडच्या नोरोना हेस, ब्रिटनचे संपर्क प्रमुख मॅथ्यू सिंकलेअर, श्रीलंकाच्या व्हिजा ऑफीसर सुमिथ्रा मिगासमुल्ला, बेल्जियमच्या वाणिज्यदूत आणि उपप्रमुख ज्युली वॅन देर लिंडेन, नॉर्वेच्या महावाणिज्य दूतांची पत्नी हेज रॉनिंग, इटलीचे उप महावाणिज्य दूत लुईगी कॅसकोन यांचा समावेश होता.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.