यंदा दसरा मेळाव्याला शिवतीर्थावर शुकशुकाट?; ठाकरेंना शह देण्यासाठी शिंदेंची खेळी

151

शिवसेनेच्या स्थापनेपासून दादरच्या शिवाजी पार्क मैदानात भव्य दसरा मेळावा आयोजित करण्याची परंपरा आहे. परंतु, शिंदेंच्या बंडखोरीनंतर शिवसेनेत दोन गट पडल्यामुळे यंदा शिवतीर्थावरून संबोधन कोण करणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी दोन्ही गटांकडून अर्ज आल्याने अधिकारीही संभ्रमात असून, संभाव्य वाद टाळण्यासाठी कोणालाही परवानगी देऊ नये, असा निर्णय घेतला जाणार असल्याचे समजते.

( हेही वाचा : मुंबईत संध्याकाळी ५ वाजताच पसरला अंधार, मुसळधार पावसाची शक्यता)

शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याच्या परवानगीसाठी उद्धव ठाकरे गटाने सर्वात आधी अर्ज केला होता. त्यापाठोपाठ एकनाथ शिंदे गटाकडूनही अर्ज दाखल करण्यात आला. आतापर्यंतच्या परंपरेनुसार आधी अर्ज करणाऱ्यास प्राधान्य, या तत्त्वावर शिवाजी पार्क मैदानावर परवानगी दिली जाते. मात्र, एकाच पक्षाकडून दोन अर्ज आल्याने अधिकारीही संभ्रमात आहेत. याशिवाय शिवसेना कोणाची, याचा निकाल न्यायालयात प्रलंबित असल्याने संभाव्य वाद टाळण्यासाठी एकाही गटाला परवानगी देऊ नये, असे बहुतांश अधिकाऱ्यांचे मत असल्याचे कळते.

दुसरीकडे, परवानगी न मिळाल्यास उद्धव ठाकरे गटाने न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे. पण शिंदे गट आणि भाजपला हेच हवे आहे. कारण मूळ शिवसेना कोणाची, याचा निर्णय प्रलंबित असल्यामुळे न्यायालय याप्रकरणी निवडा करणार नाही. त्यामुळे तेथेही उद्धवसेनेच्या पदरी निराशाच पडण्याची शक्यता अधिक असल्याचे सूत्रांनी सांगितले.

उद्धव गटासमोर अन्य कोणते पर्याय?

गेल्या ५६ वर्षांपासून शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्याची शिवसेनेची परंपरा असली, तरी याआधी दोनवेळा अन्य जागेवर दसरा मेळावा आयोजित करण्यात आला होता. बाळासाहेब असताना एकदा बिकेसीत आणि एकवेळा दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात शिवसेनेने दसरा मेळावा घेतला होता. त्याव्यतिरिक्त अन्य कोणत्या जागेवर दसरा मेळावा घेण्याची प्रथा शिवसेनेत नाही.

शिंदे गटाकडून कोंडी

उद्धव ठाकरेंकडे आता बिकेसी मैदानाचा पर्यायही उरलेला नाही. शिंदे गटाने त्यांच्याआधीच अर्ज दाखल केला आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) अखत्यारितील हे मैदान शिंदे गटाला मिळण्याची दाट शक्यता आहे. स्वतः एकनाथ शिंदे या विभागाचे मंत्री आहेत. त्यामुळे शिवाजी पार्कही नाही आणि बिकेसी मैदानही नाही, अशी उद्धव गटाची अवस्था होण्याची शक्यता आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.