मागील दोन महिन्यापासून शिवसेनेला लागलेली नेत्यांची गळती थांबण्याचं चिन्हे नाही. शिंदे गटासोबतच आता शिवसेनेतील उद्धव ठाकरेंसोबतचे नेते भाजपात प्रवेश करत आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या महाप्रबोधन यात्रा दौऱ्यापूर्वीच अमरावती जिल्हाप्रमुख राजेश वानखेडे यांनी आज, गुरूवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आहे. त्यांच्या या वातावरणामुळे तिवसा तालुक्यातील राजकीय समीकरण नक्कीच बदलणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
(हेही वाचा – CAA ला आव्हान देणाऱ्या 200 हून अधिक याचिकांवर सोमवारी सुनावणी)
याबाबत जिल्हाप्रमुख राजेश वानखेडे म्हणाले, शिंदे गटात जाणे म्हणजे शिवसेनेच्या वेगळ्या गटात जाण्यासारखं आहे. त्यामुळे मतदारसंघातील लोकांचा विचार करता ज्यांनी मागच्या निवडणुकीत मला मतं दिली त्यांची इच्छा आहे, आपण भाजपात गेले पाहिजे. भाजपा हिंदुत्ववादी पक्ष आहे. उद्धव ठाकरे हे काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आहेत. त्यामुळे सर्वानुमते शिवसैनिकांसह मी भाजपात प्रवेश करणार आहे असे त्यांनी सांगितले. २०१९ च्या निवडणुकीत तिवसा मतदारसंघात काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांच्याविरोधात राजेश वानखेडे यांनी निवडणूक लढवली होती. त्यावेळी नंबर दोनची मते वानखेडेंना मिळाली होती.
तसेच मागील अडीच वर्षात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. मतदारसंघातील कामांसाठी वारंवार त्यांच्याकडे गेलो परंतु एकही काम त्यांनी केले नाही. यशोमती ठाकूर यांच्याविरोधात आम्ही लढलो. त्यात मुख्यमंत्री आमचा असूनही कामे होत नव्हती. त्यामुळे लोकांकडून प्रश्न येत होते. त्या प्रश्नांना उत्तरं देऊन आम्ही त्रस्त झालो. पक्षप्रमुखच जर न्याय देत नसतील तर पक्षात राहायचं कशाला? असा प्रश्न राजेश वानखेडे यांनी उपस्थित केला.