भाजप-विरोधी सर्वच नेते २०२४ च्या मोर्चेबांधणीला लागले आहेत. नितीश कुमार दिल्ली दौर्यावर गेले असताना त्यांनी तिसर्या आघाडीची शक्यता नाकारली आहे. पण त्यांनी केलेले वक्तव्य गंमतीदार आहे. ते म्हणाले “थर्ड फ्रंट नही, बनना है तो मेन फ्रंट बनेगा.” नितीश कुमार यांच्या वक्तव्यामागे खूप मोठा अर्थ लपलेला आहे. पूर्वी दोन महत्वाचे पक्ष होते. भाजपा आणि कॉंग्रेस. या व्यतिरिक्त तिसरी आघाडी तयार व्हायची. पण आता कॉंग्रेसची दशा पाहता नितीश कुमार कॉंग्रेसला महत्वाचा पक्ष मानायला तयार नाही. म्हणून कॉंग्रेसला बाजूला सारुन त्यांना मेन फ्रंट तयार करायचा आहे.
( हेही वाचा : बॉलिवूडचे रीमेक नव्हेत, हे तर री-डिस्ट्रॉय)
आता नितिश कुमार यांनी भाजपला बाजूला ठेवून पुन्हा एकदा सत्ता स्थापन केलेली आहे. हे करताना ते बिहारमध्ये वाढलेली भाजपची ताकद विसरले. दुसरी गोष्ट सर्व प्रादेशिक पक्षांनी मिळून तिसरी आघाडी किंवा नितीश कुमार यांच्या भाषेतील मेन फ्रंट निर्माण केला तर त्यांच्या प्रादेशिक अस्तित्वाचं काय होईल? आणि त्यांचा नेता कोन असेल? ही सगळीच गडबड आहे.
आधी लालू प्रसाद यादव यांच्या पक्षाला नाकारत त्यांनी भाजप सोबत युती केली. आता त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिलेली आहे. पूर्वीची गोष्ट वेगळी होती. पण आता जनतेला सर्वकाळासाठी मूर्ख बनवता येत नाही. भाजपसोबत ते राहिले असते तर मानाने मुख्यमंत्रीच झाले असते. पण पुढच्या वेळी बिहारमध्ये बळ वाढलेल्या भाजपसोबत त्यांना दोन हात करावे लागणार आहेत. त्यात सतत युती-आघाडी करत बसल्यामुळे त्यांनी विश्वासार्हता गमावलेली आहे.
इतर नेत्यांप्रमाणे केवळ राज्यातच नव्हे तर मोदींना लोकसभेत पराभूत करण्याचे स्वप्न ते पाहू लागले आहेत. आपला प्रभाव कायम ठेवायचं असेल तर प्रादेशिक नेत्यांनी मोदींना लोकसभेत आव्हान देण्याचा प्रयत्न करु नये असं माझं ठाम मत आहे. मोदींवर टिका करताना नितीश कुमार म्हणाले, ” ”अटल बिहारी वाजपेयी के छह साल में कितना कार्य हुआ और अभी के कार्यकाल में कोई भी नया काम नहीं हुआ. हर चीज का नामकरण करना और बिना काम किए प्रचार करना, कुछ लोगों की आदत है कि काम न करो और सिर्फ प्रचार करो.”
खरं तर ते स्थानिक नेते आहेत. त्यांना इतर मुद्द्यांवर टिका करायची तशी गरज नाही. दुसरी गोष्ट नरेंद्र मोदींच्या कामावर खुश होऊन त्यांना पुन्हा बहुमताने जनतेने निवडून दिलं आहे. काहीच काम झालं नाही असं म्हणणे म्हणजे जनतेला वेड्यात काढण्यासारखं आहे. नितीश कुमारांना बिहारमधली आपली सत्ता शाबूत ठेवायची असेल तर तिसरी आघाडी किंवा मेन फ्रंटच्या फंदात पडू नये. सध्या मोदींच्या विरोधात ते करत असलेला प्रचार म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेणे नव्हे तर धोंड्यावर जाऊन पाय आपटण्यासारखं आहे.
Join Our WhatsApp Community