केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे मुंबई दौऱ्यावर असताना त्यांची सुरक्षा व्यवस्था भेदून शहा यांच्या ताफ्यात संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या ला अटक करण्यात आली आहे. ही अटक मोठ्या नाटकीय ढंगात करण्यात आली, कारण दोन वेळा ही संशयित व्यक्ती मोठ्या चालाखीने पोलिसांच्या हातून निसटली होती.
हेमंत पवार असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव असून, तो धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील दाऊळ गावातील पोस्टमास्तरचा मुलगा आहे. बारावीपर्यंत शिक्षण झालेल्या हेमंत पवार याने आपले गाव सोडून मुंबई- दिल्ली दौरे सुरू केले होते. त्यानंतर त्याने मागे वळून बघितले नाही आणि आपली ओळख निर्माण करण्यासाठी त्याने राजकीय नेत्यांसोबत उठ-बस सुरू केली. देशातील ५ भाषा अवगत असणाऱ्या हेमंत पवार याने दिल्लीत आपली चांगली ओळख निर्माण केली होती. बड्या नेत्यांसोबत फोटो काढून त्याचा फायदा तो स्वतःच्या स्वार्थासाठी करत होता.
मलबार हिल पोलिसांनी हेमंत पवार यांचा मोबाईल क्रमांक ट्रेस करून मुंबईतील नाना चौक येथून सोमवारी रात्री त्याला अटक करण्यात आली. हेमंत पवार याच्याकडून पोलिसांनी केंद्रीय गृहमंत्रालयाचे निळे रिबीन असलेले ओळखपत्र तसेच संसद भवनात प्रवेशासाठी खासदाराच्या स्वीय सहाय्यकसाठी लागणारा चालू महिन्याचा पास सापडलाआहे.
त्याने एसीपीलाही गंडवले …
५ सप्टेंबर रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या बंदोबस्तासाठी सागर बंगल्यावर तैनात असलेले सहाय्यक पोलीस आयुक्त नीलकंठ पाटील यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या ताफ्यात निळ्या कोटात असलेल्या हेमंत पवार याला अडवले होते. त्यावेळी त्याने स्वतःचे ओळखपत्र दाखवून दिल्ली येथून आलेल्या सुरक्षा पथकातील अधिकारी असल्याचे सांगितले होते. अमित शहा हे तिथून वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री यांच्या भेटीसाठी आले असता, हेमंत पवार हा वर्षा बंगल्याच्या प्रवेशद्वाराठिकाणी पाटील यांना आढळून आला असता पाटील यांना संशय येताच त्यांनी पुन्हा त्याच्याकडे चौकशी केली असता मी केंद्रीय सुरक्षा यंत्रणेतील अधिकारी असल्याचे पाटील यांना सांगितले. पाटील यांनी त्याचे नाव व मोबाईल क्रमांक नोंदवून घेतला होता.
पोलीस उपायुक्त यांनी पाठवला फोटो
केंद्रीय राखीव सुरक्षा दलाच्या काही अधिकारी-यांचे संशयित हेमंत पवार यांच्यावर बारीक लक्ष होते आणि त्याचा फोटोदेखील केंद्रीय सुरक्षा दलाने काढला होता. त्यांचा संशय बळावल्यामुळे त्यांनी तो फोटो मुंबई पोलीस दलाचे पोलीस उपायुक्त यांना पाठवून चौकशी केली. पोलीस उपायुक्त यांनी तो फोटो एसीपी नीलकंठ पाटील यांना पाठवून चौकशी करण्यास सांगितले असता पाटील काही क्षण उडाले व त्यांनी तत्काळ पोलीस उपायुक्त यांना कळवले की या व्यक्तीला आपण दोन वेळा हटकले होते. त्याने केंद्रीय सुरक्षा यंत्रणेचे ओळखपत्र दाखवून केंद्रीय सुरक्षा अधिकारी असल्याचे सांगितले होते. त्याचे नाव आणि मोबाईल क्रमांक नोंदवून घेतला आहे, असे पाटील यांनी कळवले. पोलीस उपायुक्त यांनी त्याचा शोध घेण्यास सांगितले व पाटील यांनी तत्काळ मलबार हिल पोलिसांच्या मदतीने हेमंत पवार यांचा मोबाईल फोन ट्रेसिंगला टाकला असता हेमंत पवार हा नाना चौक परिसरात असल्याची माहिती मिळताच पोलीस पथक तत्काळ नाना चौक येथे आले व हेमंत पवार याला ताब्यात घेतले.
सुरक्षा यंत्रणेत त्रुटी
अतिमहत्त्वाच्या व्यक्तीसाठी तैनात करण्यात आलेली कडक सुरक्षा व्यवस्था भेदून एक व्यक्ती थेट अतिमहत्त्वाच्या व्यक्तीच्या ताफ्यात प्रवेश करून निसटतो याचा अर्थ मुंबई पोलिसांच्या सुरक्षा व्यवस्थेत त्रुटी होती असा होतो. मुंबईत लालबागच्या राजाच्या दर्शनाला तसेच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या भेटीला आलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या ताफ्यात सुरक्षा भेदून प्रवेश करणारा हेमंत पवार यांच्या अटकेनंतर सुरक्षा यंत्रणेतील ही त्रुटी समोर आली. परंतु सहाय्यक पोलीस आयुक्त नीलकंठ पाटील यांच्या शहाणपणामुळे हेमंत पवार याला अटक करण्यात मुंबई पोलिसांना यश मात्र आले. पाटील यांनी त्याचा मोबाईल क्रमांक आणि नाव नोंदवून घेतले नसते तर मुंबई पोलीस हेमंत पवारला ‘ढुंढते रहे जाते’ अशी अवस्था झाली असती.
हेमंत पवार याला अटक करून चौकशी करण्यात आली असता त्याने ‘मी आंध्रप्रदेशातील एका खासदारांचा स्वीय सहाय्यक असल्याचे सांगितले. परंतु तो खरे बोलत आहे की नाही याची चौकशी सुरू असून त्याच्याकडे सापडलेले ओळखपत्र आणि संसद भवनातील प्रवेशाचा पास तपासासाठी केंद्रातील सुरक्षा यंत्रणेकडे पाठवण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तेथून अहवाल आल्यावर नक्की कळेल की त्याला ओळखपत्र आणि पास कोणी दिले किंवा त्याने स्वतः बनवले का याचा उलगडा होईल.
Join Our WhatsApp Community